तासगाव (जिल्हा सांगली) – भाद्रपद शुक्ल प्रतिपदा म्हणजे १६ सप्टेंबरपासून तासगाव येथील श्री गणपति पंचायतन देवस्थानचा २४४ वा गणेशोत्सव प्रारंभ होत आहे. सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी चालू केलेल्या या उत्सवाचे विशेष म्हणजे येथील गणपति मंदिरातील श्री गणेशमूर्ती ही उजव्या सोंडेची असून हा गणपति नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. १६ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता ‘श्रीं’ची षोडशोपचार महापूजा आणि आरती होईल. दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ पर्यंत ह.भ.प. गजाननबुवा वाठारकर यांचे नारदीय कीर्तन, तर सायंकाळी ६ ते रात्री ७ या वेळेत ‘श्रीं’चा छबिना होईल. या प्रसंगी भजन, पोवाडे आणि गायन होईल.
१७ सप्टेंबरला रात्री ७.३० ते ८.३० श्री. राजेंद्र पटवर्धन यांचे शास्त्रीय सतारवादन होईल. १९ सप्टेंबर म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वाजता ‘श्रीं’च्या मूर्तीचे श्रीमंत पटवर्धन राजवाड्यात आगमन, सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजता ‘श्रीं’ची १ सहस्र दुर्वायुक्त महापूजा होईल. याचे पौरोहित्य पंडित अनंतशास्त्री जोशी करतील. रात्री ८ ते ९ या वेळेत श्री गणपति मंदिर येथे श्रींचा मंत्रजागर होईल.
२० सप्टेंबरला ‘श्रीं’चा २४४ वा रथोत्सव !
२० सप्टेंबरला दुपारी १ ते सायंकाळी ५ पर्यंत २४४ वा रथोत्सव होईल. हा रथोत्सव श्री गणपति मंदिर येथून प्रारंभ होईल. तो काशीविश्वेश्वर मंदिर येथे जाऊन परत श्री गणपति मंदिर येथे येईल.
२१ सप्टेंबरला रात्री ९ वाजता पंडित गजाननबुवा वाठारकर यांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. राजेंद्र परशुराम पटवर्धन, श्री. राहुल पटवर्धन, श्री. पवनसिंह कुडमल, श्री. अथर्व अनंत जोशी यांनी केले आहे.