पुणे येथे ‘ऑनलाईन टास्‍क’च्‍या माध्‍यमांतून १९ कोटी रुपयांची फसवणूक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – ‘एम्.एस्.ई.बी.’चे देयक भरण्‍यास सांगून फसवणूक, ‘सेक्‍स टॉर्शन’च्‍या (व्‍यक्‍तीचा अश्‍लील व्‍हिडिओ सिद्ध करून त्‍याद्वारे छळणे) घटनांद्वारे फसवणूक या घटनांमध्‍ये न्‍यूनता दिसून आली आहे; मात्र सध्‍या ‘ऑनलाईन टास्‍क’ हा फसवणुकीचा नवीन प्रकार (ट्रेंड) सामाजिक माध्‍यमांतून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ‘यूट्यूब’वरील चित्रफीतीला (व्‍हिडिओ) लाईक (पसंतीची खूण करणे) करून त्‍याचा ‘स्‍क्रीन शॉट’ पाठवल्‍यास पैसे मिळतील, ‘गुगल’वर आस्‍थापनाला ‘रिव्‍ह्यू’ (मत) दिल्‍यास अधिकोषातील (बँक) खात्‍यात पैसे जमा होतील, असे आमीष दाखवून लोकांना फसवणूक करण्‍याचा प्रकार वाढत आहे. पुणे सायबर गुन्‍हे शाखेकडे जानेवारी ते ऑगस्‍ट या काळात १८७ तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्‍यातून १९ कोटी १० लाख ५४ सहस्र रुपयांची फसवणूक केल्‍याचे समजते. (एवढ्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्‍हेगारीच्‍या माध्‍यमातून लोकांची फसवणूक होत आहे, तर सायबर पोलीस याविषयी कठोर पावले केव्‍हा उचलणार ? – संपादक)

या माध्‍यमातून फसवणूक झालेले काही नागरिक तक्रार देण्‍यासाठी पुढे येत नाहीत, तर काही तक्रार अर्जांविषयी अन्‍वेषण करून गुन्‍हा नोंद करण्‍याची कार्यवाही चालू आहे. नागरिकांनी ‘ऑनलाईन’ फसवणूक टाळण्‍यासाठी दक्षता घ्‍यावी, असे आवाहन आर्थिक आणि सायबर गुन्‍हे शाखेचे पोलीस आयुक्‍त श्रीनिवास घाडगे यांनी केले आहे. वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांनी सांगितले की, घरबसल्‍या ‘लाईक’ किंवा ‘रिव्‍ह्यू’ करून कुणीही पैसे देत नाही. ‘रिव्‍ह्यू’ देण्‍यापूर्वी संबंधित आस्‍थापनाची पडताळणी करून घ्‍यावी. अनोळखी ‘लिंक’वर ‘क्‍लिक’ करू नका, कोणत्‍याही आमीषाला बळी पडू नका.