मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेपूर्वीचा मुख्यमंत्र्यांचा संवाद माध्यमांवरून प्रसारित !
मुंबई – मराठा आरक्षणाविषयीच्या पत्रकार परिषदेला व्यासपिठावर येत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून ‘आपल्याला काय ? बोलायचे आणि निघून जायचे. बोलून मोकळ व्हायचे’, हे वक्तव्य सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाले आहे. यावरून विरोधकांनी टीका केली असून एकनाथ शिंदे यांनी हे अर्धवट वक्तव्य प्रसारित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने ११ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केले. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने ‘माईक चालू आहे’, असे एकनाथ शिंदे यांना सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचे हे वक्तव्यही प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये आहे.
विरोधक अपसमज पसरवत आहेत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मराठा आरक्षणाविषयी सरकार प्रारंभीपासून संवेदनशील आहे. कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्यासाठी सरकार प्राधान्याने काम करत आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून याविषयी एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना ‘व्हिडिओ क्लीप’ चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात अपसमज पसरवण्याचे काम करत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे.