परिवहन विभागाच्या तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीचा शासनाचा आदेश कागदावरच !

‘महाआयटी’ आस्तापनाला काम दिलेच नाही !

श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

मुंबई – परिवहन विभागाची ‘तक्रार निवारण प्रणाली’ आणि ‘मोबाईल अ‍ॅप’ यांची देखभाल अन् दुरुस्ती करण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने ८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी शासनआदेश काढला आहे. या आदेशामध्ये हे काम ‘मे. महाआयटी’ आस्थापनाला देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी ३७ लाख ७४ सहस्र ६५७ रुपये इतके प्रावधानही करण्यात आले आहे. प्रत्यक्षात ७ मास झाले, तरी ‘महाआयटी’कडे हे काम देण्यात आलेले नाही, तसेच ज्या तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी हा आदेश काढण्यात आला होता, त्या मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावरील ‘अ‍ॅप’ही बंद आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुटमार पहाता हे ‘अ‍ॅप’ आतापर्यंत चालू होणे अपेक्षित होते. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ‘महाआयटी’च्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे हे काम आले नसल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी राज्याचे परिवहन उपायुक्त संदेश चव्हाण यांच्याशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी ‘सरकारच्या ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वर तक्रार स्वीकारण्याची सुविधा आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीवर व्यय करण्यापेक्षा ‘आपले सरकार’ या ‘पोर्टल’वरच तक्रार स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे गृहविभागाच्या सचिवांनी ‘संबंधित शासनआदेश रहित करण्यात आला आहे’, असे सांगितले. प्रत्यक्षात राज्य सरकारच्या संकेतस्थळावर या शासन आदेशावर कोणताही सुधारित आदेश काढण्यात आलेला नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, ‘अ‍ॅप’च्या दुरुस्तीचे काम ‘महाआयटी’कडे देण्यात आले आहे आणि त्यासाठी निधीचे प्रावधानही करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही.

मग निधी कुठे गेला ?

या वेळी परिवहन उपायुक्त संदेश चव्हाण यांनी ‘आपले सरकार पोर्टलवरही तक्रारी येत आहेत. त्याच्या आधुनिकीकरणाचे कामही चालू आहे. परिवहन विभागाचा ‘ई मेल आयडी’, हेल्पलाईन क्रमांक, अधिकार्‍यांचे वैयक्तिक ई मेल आयडी यांवरही तक्रारी येत आहेत’, असे सांगितले. ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रारी स्वीकारण्यात येत असतील, तर ७ मासांनंतरही शासनआदेश रहित का करण्यात आला नाही ? तसेच शासन आदेशात प्रावधान करण्यात आलेल्या निधीचे काय ?’ असे प्रश्‍न निर्माण होत आहेत.

‘आर्.टी.ओ.’च्या संकेतस्थळावरील नादुरुस्त ‘अ‍ॅप’ अद्यापही तसेच !

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या अंतर्गत मोटार वाहन विभाग येतो. या विभागाच्या ‘https://transport.maharashtra.gov.in/’ या संकेतस्थळावर ‘नागरिक सेवा’ या शीर्षकाखाली नागरिकांना तक्रार करण्यासाठी ‘संकेतस्थळ’ आणि ‘अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल अ‍ॅप’ हे दोन पर्याय देण्यात आले आहेत. मागील अनेक मासांपासून हे नादुरुस्त आहेत; मात्र ते अद्यापही संकेतस्थळावरून हटवण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी तक्रारीसाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलची लिंकही ठेवण्यात आलेली नाही. यातून परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार पुढे आला आहे.