वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) शहरात भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात लहान मुलगा गंभीररित्या घायाळ

वेंगुर्ला – शहरातील गाडीअड्डा येथे एका लहान मुलावर अचानक ८ ते १० भटक्या कुत्र्यांनी आक्रमण करून त्याचा चावा घेतला. यामुळे तो मुलगा गंभीररित्या घायाळ झाला. या घटनेनंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन ‘ही गंभीर घटना असून भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा’, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ला शहरात मोकाट कुत्र्यांमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणाच्या घटना शहरात घडत असतात. नगरपालिकेने काही मासांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबवली होती; मात्र वरील घटनेमुळे ही मोहीम अयशस्वी झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.

संपादकीय भूमिका

कुत्र्यांची समस्याही सोडवू न शकणारे प्रशासन राज्याचा कारभार कसा हाकत असेल ?, हेच यावरून लक्षात येते ! यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे !