एखाद्या डाकूने स्वतःचे नाव पालटून गांधी केले, तर तो संत होईल का ? – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची ‘गांधी’ आडनावावरून काँग्रेसवर टीका !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – मी बरेच दिवस संशोधन केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे कोणत्या सूत्रांनुसार गांधी आहेत ? म. गांधी यांनी देश स्वतंत्र केला आणि तुम्ही लोकांनी ‘गांधी’ ही पदवी धारण केली. तुम्ही लोक बनावट गांधी आहात. उद्या एखाद्या डाकूने स्वतःचे नाव पालटून ‘गांधी’ केले, तर तो संत होईल का ?, आ प्रश्‍न आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथील भाजपच्या मुख्यालयातील भाजप महिला मोर्चाच्या कार्यक्रमात बोलतांना उपस्थित केला.

मुख्यमंत्री सरमा यांनी मांडलेली सूत्रे

१. ‘भाजपला ‘भारत’ नावाची भीती वाटते’, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. जेव्हा मत घेण्याची वेळ येते, तेव्हा काँग्रेस ‘भारत जोडो यात्रा’ काढते. निवडणुका संपल्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या आघाडीचे नाव पालटून ‘इंडिया’ केले. तुम्ही लोक ‘इंडिया’ कसे?

२. भारताचा पहिला घोटाळा एका शीर्षकापासून प्रारंभ झाला. शीर्षकाप्रमाणे काँग्रेसने देशाचे नाव बळकावले आणि ‘इंडिया’ झाले. काँग्रेसने कधीही भारताचा अभिमान वाढवला नाही. देशाच्या नावाखाली काँग्रेसने घराणेशाही वाढवून देश तोडण्याचे काम केले. त्यांना ‘इंडिया’ म्हणण्याचाही अधिकार नाही, भारताचे तर त्यांनी नावही घेऊ नये.

काँग्रेसचे प्रत्युत्तर  

मुख्यमंत्री सरमा यांच्या विधानावर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले की, जसे तुमचे नाव तुमचे वडील कैलाश नाथ सरमा यांच्याकडून आले, तसेच राजीव गांधी यांना त्यांचे वडील फिरोज गांधी यांच्याकडून नाव मिळाले.