ठाणे ते बदलापूर लोकलमधील अपंगांच्या डब्यातील २७६ सुदृढ प्रवाशांवर कारवाई !

अपंगांकडून तक्रारी आल्यावर कारवाई

ठाणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – लोकलमध्ये अपंगांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या २७६ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बळाच्या विशेष पथकाने कारवाई केली. ठाणे ते बदलापूर या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान ही विशेष मोहीम राबवण्यात आली. अपंगांच्या डब्यातून सकाळ, संध्याकाळ, तसेच गर्दीच्या वेळेत अनेक सुदृढ प्रवासीही प्रवास करतात. त्यामुळे अपंगांना प्रवास करणे कठीण जाते. याविषयीच्या तक्रारी अपंगांकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.

कल्याण येथील रेल्वे सुरक्षा बळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा जवानांची विशेष पथके ठाणे ते बदलापूर या रेल्वेस्थानकांच्या फलटांवर तैनात केली होती. ७ सप्टेंबर या दिवशी संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत अपंगांच्या डब्यातून प्रवास करतांना ठाणे रेल्वेस्थानकात ७२, डोंबिवली येथे ६७, कल्याण येथे ८० आणि बदलापूर येथे ५७ सुदृढ प्रवाशांना जवानांनी कह्यात घेतले. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी कल्याण रेल्वे न्यायालयात विशेष न्यायालय चालू करून न्यायाधीश स्वयम चोपडा, विशेष सुरक्षा आयुक्त ऋषि कुमार शुक्ला यांनी दोषी प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली, तसेच ‘पुन्हा अपंगांच्या डब्यातून प्रवास करतांना आढळून आल्यास कारागृहात पाठवले जाईल’, अशी चेतावणी न्यायालयाने या प्रवाशांना दिली आहे.

संपादकीय भूमिका

अपंगांचा विचार न करता स्वार्थ साधणारे प्रवासी !