सांस्‍कृतिक प्रदर्शनात भारताकडून ‘ऋग्‍वेद’ आणि महर्षि ‘पाणिनी’ यांच्‍या ‘अष्‍टाध्‍यायी’चे हस्‍तलिखित !

नवी देहलीतील ‘जी-२०’ परिषद

पुणे – नवी देहली येथील ‘भारत मंडपम्’ येथे ‘जी-२०’च्‍या राष्‍ट्रप्रमुखांच्‍या शिखर परिषदेप्रसंगी ‘कल्‍चरल कॉरिडॉर’ हे प्रदर्शन भरवण्‍यात आले आहे. या प्रदर्शनामध्‍ये येथील ‘भांडारकर प्राच्‍यविद्या संशोधन संस्‍थे’कडून ४ वेदांपैकी ‘ऋग्‍वेदा’चे हस्‍तलिखित ठेवण्‍यात येणार आहे. यासह देहलीच्‍या ‘लालबहादूर शास्‍त्री विद्यापिठा’कडून महर्षि ‘पाणिनी’ यांच्‍या‘अष्‍टाध्‍यायी’चेही हस्‍तलिखित ठेवण्‍यात येणार आहे.

भांडारकर प्राच्‍यविद्या संस्‍थेच्‍या कार्यकारी मंडळाचे अध्‍यक्ष भूपाल पटवर्धन म्‍हणाले की, संस्‍थेतील हे काश्‍मिरी भूर्जपत्राचे हस्‍तलिखित अंदाजे ५०० वर्षांपूर्वी ‘शारदा लिपी’त लिहिलेले आहे. जॉर्ज ब्‍यूह्लर या विद्वानाने ते वर्ष १८७५ मध्‍ये मिळवले. ‘ऋग्‍वेदा’च्‍या अतिशय जुन्‍या आणि शुद्ध हस्‍तलिखितांपैकी ते एक मानलेले आहे. भांडारकर संस्‍थेच्‍या डॉ. अमृता नातू आणि संशोधन साहाय्‍यक बाळकृष्‍ण जोशी हे ‘ऋग्‍वेदा’ची संबंधित प्रत घेऊन देहलीला जाणार आहेत.

‘ऋग्‍वेद’ हा लोकशाहीचा आद्य उद़्‍गार !

भूपाल पटवर्धन म्‍हणाले की, ‘ऋग्‍वेद’ हा लोकशाहीचा आद्य उद़्‍गार आहे. ‘ऋग्‍वेद’ हा जगात उपलब्‍ध असणारा सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे. त्‍यात मानवाच्‍या कल्‍याणाचा विचार, तसेच तत्त्वज्ञान प्रतिबिंबित होते. ‘जी-२०’ परिषदेच्‍या ‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’ (सारे विश्‍व हे एक कुटुंब) या बोधवाक्‍याशी सुसंगत असे हे तत्त्व आहे. राजावर नियंत्रण ठेवणारी सामान्‍य लोकांची ‘समिती’ आणि तज्ञांची ‘सभा’ या २ आद्य लोकशाही संस्‍थांचा उल्लेख ‘ऋग्‍वेदा’मध्‍ये आढळतो. त्‍या अर्थाने ‘ऋग्‍वेद’ हा लोकशाहीचा आद्य उद़्‍गार आहे’, असे म्‍हणता येईल.