सूर्याविषयी संशोधन करण्यासाठी ‘आदित्य एल्-१’ यानाचे २ सप्टेंबर या दिवशी यशस्वी प्रक्षेपण झाले. आतापर्यंत अमेरिका, जपान, चीन आणि रशिया या देशांनीच सौरमोहिमा पार पाडल्या आहेत. असे जरी असले, तरी भारताच्या या सौरमोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मोहीम नेहमीप्रमाणे अत्यल्प व्ययात म्हणजे केवळ ४०० कोटी रुपयांमध्ये पार पडत आहे. यानात शास्त्रज्ञांच्या दृष्टीने अत्याधुनिक छायाचित्रक बसवले आहेत, जे सूर्याच्या कोरोनाचे म्हणजेच सौर किरीटाचे निरीक्षण करणार आहेत. सौर वातावरणात सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात होणार्या पालटांचेही निरीक्षण करण्यात येणार आहेत. सूर्यावर भूकंप होऊन लाखो टन सौरघटक अंतराळात फेकले जातात. हे संशोधन महत्त्वाचे आणि एकमेवाद्वितीय असणार आहे. पुढील ५ वर्षे आदित्य एल्-१ कार्यरत रहाणार आहे. काहींना वाटले चंद्रयान पाठवल्यावर त्वरितच सौरयान कसे पाठवू शकतो ? त्याचे कारण इस्रोच्या अनेक मोहिमांची सिद्धता आधीच झालेली असते. इस्रोतील शास्त्रज्ञ एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करत असतात. ते प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. ‘आदित्य एल्-१’ प्रक्षेपणामुळे भारतवासियांना आनंद झाला असून त्यांना शास्त्रज्ञांचा अभिमानही वाटत आहे.
भारत शास्त्रज्ञांच्या पराक्रमाचे हे क्षण साजरे करत असतांना इस्रोचे माजी प्रमुख आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ जी. माधवन् नायर यांचे विधान चर्चेत आले आहे. ते म्हणतात की, पूर्वीच्या सरकारांकडून त्यांना तेवढे सहकार्य मिळाले नाही. मोदी सत्तेत आल्यानंतर आमच्या मोहिमांना सहकार्यही मिळाले आणि गतीमानताही आली आहे. पूर्वीच्या सरकारच्या अनास्थेविषयी प्रसिद्ध शास्त्रज्ञ नंबी नारायण यांनीही काही दिवसांपूर्वी विधान केले आहे. म्हणजे एकीकडे आपण एका मागोमाग एक यशस्वी मोहिमा आखत असतांना शास्त्रज्ञही त्यांना त्या त्या काळात आलेल्या अडचणी, अडथळे लोकांमध्ये येऊन मोकळेपणाने व्यक्त करत आहेत. हे एकप्रकारे चांगलेच आहे. देशातील कोणताही मोठा राष्ट्रीय प्रकल्प, योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ज्याप्रमाणे संबंधित क्षेत्रातील तज्ञांची आवश्यकता असते, तसेच राजकीय इच्छाशक्तीचीही तेवढीच आवश्यकता असते. परिणामी काम करणार्यांचे मनोबल वाढते. राष्ट्रीय हिताशी संबंधित प्रकल्पांमध्ये काम करतांना सर्व प्रकारची जोखीम केवळ संबंधित तज्ञांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा असते. शासन आपल्या मागे आहे, ही निश्चिती पटली, तर व्यक्ती राष्ट्रासाठी सर्वोत्तम योगदान द्यायला सिद्ध होतो.
शास्त्रज्ञांचे गूढ मृत्यू !
शास्त्रज्ञांचे सूत्र आले, तर आठवते की, मागील काही दशकांमध्ये अणू आणि अंतराळ वैज्ञानिकांचा गूढरित्या झालेला मृत्यू ! वर्ष १९६६ मध्ये होमी भाभा यांचा विमान अपघातात मृत्यू, वर्ष १९७१ मध्ये भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा एका हॉटेलमध्ये मृत्यू, वर्ष २००९ मध्ये लोकनाथ महालिंगम् यांचा बेपत्ता होऊन मृत्यू, तर वर्ष २००९ ते २०११ या कालावधीत ११ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. शास्त्रज्ञांच्या या संशयास्पदरित्या मृत्यूची उच्च न्यायालयाने नोंद घेऊन केंद्राला शास्त्रज्ञांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले. इंग्रजी दैनिक ‘संडे गार्डियन’ने शास्त्रज्ञांच्या मृत्यूविषयी एक लेख प्रसिद्ध करून काँग्रेस सरकारने या मृत्यूंकडे लक्ष न दिल्याविषयी टीका केली आहे. या शास्त्रज्ञांचे अलीकडच्या काळात अधिक संख्येत मृत्यू झाल्याने ‘हा काहीतरी वेगळा विषय आहे’, याकडे तरी लक्ष गेले, अन्यथा शास्त्रज्ञांचे मृत्यू, ही एक सामान्य घटना म्हणून पाहिले गेले असते. काँग्रेस सरकारने तसे पाहिलेच आहे, त्यामुळे त्यांना या मृत्यूंविषयी गांभीर्य वाटले नाही, तसेच त्यांना देशाच्या कुठल्याही महत्त्वाच्या अथवा सामान्य विषयांप्रतीही गांभीर्य वाटत नाही. सध्याच्या शासनकर्त्यांनी मात्र ही चूक सुधारावी आणि शास्त्रज्ञांच्या मृत्यूंची गंभीर नोंद घेऊन नव्याने अन्वेषण करून शास्त्रज्ञांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. शास्त्रज्ञ देशासाठी जे काही करू शकतात, ते अन्य कुणीही करणे शक्य नसते. देशाच्या शास्त्रज्ञांचा गूढरित्या मृत्यू, हा देशाच्या बौद्धिक संपदेवर घातलेला, कधीही भरून येऊ न शकणारा आघात आहे, हे येथे लक्षात घ्यावे.
विदेशींना मिरच्या झोंबल्या !
भारतीय अंतराळाची एक एक शिखरे पादाक्रांत करत असतांना विदेशींना मात्र त्याचे कौतुक वाटण्याऐवजी मत्सर वाटतो. वर उल्लेख केलेल्या शास्त्रज्ञांच्या मृत्यूमागे, भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये खोडा घालण्यासाठी विदेशी गुप्तचर यंत्रणाच कार्यरत होत्या. याविषयी त्या संस्थांमध्ये काम करणार्यांनीच सांगितले आहे, हे विशेष आहे. काँग्रेसला मात्र हे शोधता आले नाही. वर्ष २०१४ मध्ये भारताने मंगळ मोहीम अल्प व्ययात पार पाडली. या मोहिमेवर टीका करतांना अमेरिकेतील इंग्रजी वर्तमानपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वर्णद्वेषी व्यंगचित्र रेखाटले होते. त्यामध्ये एका प्रगल्भ लोकांच्या अंतराळ ‘क्लब’मध्ये विदेशी शास्त्रज्ञ एकत्र बसले असून ते भारताच्या मंगळ मोहिमेची चर्चा करतांना एक भारतीय शेतकरी गायीला घेऊन त्या ‘क्लब’चा दरवाजा ठोठावत आहे, असे दाखवले होते. भारतियांची निर्भत्सना करणारे, थट्टा करणारे, भारतियांना न्यून लेखणारे असे हे व्यंगचित्र होते. यशस्वी चंद्रयान मोहिमेमुळे आणि आताच्या अल्प व्ययातील सौरयान मोहिमेमुळे भारताच्या क्षमतेला न्यून लेखणार्या विदेशींना चांगलीच चपराक बसली आहे. प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनीही भारतियांच्या या वैशिष्ट्याचे कौतुक करून विदेशींना भारताकडून शिकण्यास सांगितले आहे. भारत पूर्वापार सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगत होता. विदेशींनी हे ज्ञान भारताकडून विविध माध्यमांतून चोरून त्यांच्या नावे खपवले आहे. आताची कामगिरी करणारे शास्त्रज्ञ हे भारतियांसाठी आदर्श आहेत. केवळ पैसा, प्रसिद्धी, विदेशांत जाणे यांमागे धावणार्या युवा पिढीला अंतराळ क्षेत्राचे मोठे दालन कर्तृत्व गाजवण्यासाठी खुणावत आहे. त्याचा त्यांनी लाभ घेऊन वैज्ञानिकांच्या पुढच्या पिढ्यांच्या रूपात काम करावे, ही सदिच्छा !
शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाची नोंद घेणाऱ्या शासनकर्त्यांनी शास्त्रज्ञांच्या गूढ मृत्यूचे नव्याने अन्वेषण करून त्यांना न्याय द्यावा ! |