मुंबई – प्रशासकीय कामकाजाविषयी येणार्या समस्या नागरिकांना मांडता याव्यात, यासाठी ‘जनता दरबार’ ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी प्रतीमासात जनता दरबार भरवणे आवश्यक आहे; मात्र सद्यःस्थितीत अनेक जिल्ह्यांत जनता दरबार भरतच नाहीत. त्यामुळे मंत्र्यांना निवेदने देण्यासाठी नागरिकांना थेट मुंबईत मंत्रालयात यावे लागत आहे. सद्यःस्थितीत मंत्रालयाच्या ‘गार्डन गेट’च्या बाहेर मंत्रालयाच्या कामकाजाच्या दिवशी नियमितपणे मोठी रांग लावावी लागत आहे. याचा पोलीस यंत्रणेवरही ताण पडत आहे.
मंत्रालयातातील गर्दी अल्प व्हावी, यासाठी मंत्रालयाच्या बाहेर शासनाच्या विविध विभागांचे अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण २४ खिडक्या चालू करण्यात आल्या आहेत. या खिडक्यांवर निवेदने स्वीकारण्यात येत असल्यामुळे नागरिकांना मंत्रालयात प्रवेश करावा लागत नाही. असे असतांनाही ‘गार्डन गेट’च्या बाहेर नियमित शेकडो नागरिकांची मोठी रांग लागत आहे. २२ ऑगस्ट या दिवशी ५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी मंत्रालयाला भेट दिली.
पोलीस आणि नागरिक यांच्यात नियमित होत आहेत वाद !
नागरिकांना दुपारी २ वाजल्यानंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात येतो; मात्र नागरिक सकाळपासून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर रांगा लावतात. नागरिक राज्याच्या कानाकोपर्यांतून येत असल्यामुळे लवकर प्रवेश मिळावा, यासाठी काही नागरिक पोलिसांशी वाद घालत आहेत. नागरिक आणि पोलीस यांच्यातील हा वाद आता नित्याचा झाला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
नियमित जनता दरबार भरवणे आवश्यक !
जनता दरबार भरत नसल्यामुळे नागरिक मंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत येतात. जनता दरबारामध्ये स्थानिक स्तरावर अडचणी सोडवल्या गेल्यास नागरिकांवर मंत्रालयात येण्याची वेळ येणार नाही. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचू शकतील.
संपादकीय भूमिकाजनता दरबार नियमित भरवण्याविषयी शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे ! |