हिंदु आणि मुसलमान समाजातील ३५ जणांवरील दंगलीचे गुन्‍हे रहित !

शेलगाव येथे विवाहाच्‍या वरातीमधील हाणामारीचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – जिल्‍ह्यातील कन्‍नड तालुक्‍यातील शेलगाव येथे एका हिंदु विवाहाच्‍या समारंभात डीजे लावण्‍याच्‍या कारणावरून हिंदु आणि मुसलमान या समाजातील लोकांमध्‍ये हाणामारी होऊन दंगल झाली होती. या प्रकरणी ग्रामस्‍थांनी तडजोड घडवून आणल्‍यानंतर मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठाचे न्‍यायमूर्ती आर्.जी. अवचट आणि न्‍यायमूर्ती संजय देशमुख यांनी ३५ जणांवरील गुन्‍हे रहित करण्‍याचे आदेश दिले. आरोपींनी प्रत्‍येकी ५ सहस्र रुपये म्‍हणजे एकूण १ कोटी ७५ लाख रुपये दत्ताजी भाले रक्‍तपेढी आणि खंडपिठाच्‍या वाचनालयास समान विभागून देण्‍याचे निर्देश दिले.

शेलगाव येथे २९ मे २०२३ या दिवशी विवाह समारंभासाठी विविध गावांमधून नागरिक जमा झाले होते. डीजे लावून नवरदेवाची वरात काढत असतांना वरात मशिदीसमोर आल्‍यावर नावेद पटेल याने डीजे बंद करण्‍यास सांगितला. त्‍यानंतर वधूचा भाऊ आणि नावेद पटेल यांच्‍यात डीजे बंद करण्‍याच्‍या कारणावरून वाद झाला. या वेळी विवाहाच्‍या मंडपात हिंदु आणि मुसलमान या २ गटांत हाणामारी झाली. यामध्‍ये बाबूलाल पटेल यांच्‍या पोटावर चाकूचा वार करण्‍यात आला. यात नारायण सोनवणे आणि इतर ४ व्‍यक्‍तींना दुखापत झाली होती.

या प्रकरणी ११ हिंदू, तर २४ मुसलमान नागरिक यांच्‍यावर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले होते. त्‍यानंतर शांतता समितीच्‍या बैठका घेण्‍यात आल्‍या. फुलंब्री तालुक्‍यातील निधोना, बाबरा आणि सोनारी अन् शेलगाव येथील ग्रामस्‍थ, सरपंच आणि प्रतिष्‍ठित नागरिक यांनी दोन्‍ही गटांत तडजोड (समेट) घडवून आणला.