बिहार सरकारने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या नावे असलेल्या बागेचे नाव पालटल्यावरून वाद !

पाटलीपुत्र (बिहार) – येथील कंकडबाग येथे असलेल्या ‘अटल बिहारी वाजपेयी पार्क’चे नाव पालटून ते ‘कोकोनट पार्क’ करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर बिहारचे पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव यांनी त्याचे नव्याने उद्घाटनही केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘श्रद्धेय अटलजी’ म्हणून संबोधतात, तर दुसरीकडे अशा प्रकारे त्यांच्या नावाने असलेल्या बागेचे नाव पालटतात, असा रोष भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ऑगस्ट २०१८ मध्ये वाजपेयी यांचे निधन झाल्यावर जनतेने उत्स्फूर्तपणे या बागेचे नाव त्यांच्या नावे ठेवले होते. बिहारच्या पर्यावरण विभागाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपने या बागेचे नाव पूर्ववत् करण्याची मागणी केली आहे.