देहलीतील महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपसंचालकाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक

  • मुलीवर गर्भपातासाठी दवाब टाकल्यावरून आरोपीच्या पत्नीलाही अटक

  • पीडित मुलगी आरोपीच्या मृत मित्राची मुलगी !

नवी देहली – देहली सरकारमधील महिला आणि बाल कल्याण विभागातील उपसंचालक पदावरील अधिकार्‍याला स्वतःच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. देहली सरकारने या अधिकार्‍याला निलंबित केले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता; मात्र त्याला अटक केली नव्हती. यामुळे देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस जारी करत याप्रकरणी कारवाईचा आदेश दिला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अधिकार्‍यास अटक केली. (असा आदेश का द्यावा लागतो ? पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव नसते का ? – संपादक)

पीडित मुलगी या अधिकार्‍यांच्या मित्राची मुलगी होती. मित्राच्या निधनानंतर तिला अधिकार्‍याने स्वतःच्या घरी ठेवले होते. नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या काळात या अधिकार्‍याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला होता. त्यामुळे ही मुलगी गर्भवती राहिली होती. या अधिकार्‍याच्या पत्नीने मुलीवर गर्भपात करण्याचा दबाव टाकला होता. (अशा स्त्रिया म्हणजे स्त्रीजातीला लागलेला कलंक होय ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

अशा विश्‍वासघातकी आणि नात्याला काळीमा फासणार्‍यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !