गेवराई शहरामध्‍ये चालू असलेले अनधिकृत पशूवधगृह बंद करा ! – सकल हिंदु समाज

प्रतिकात्मक छायाचित्र

गेवराई (जिल्‍हा बीड) – शहरातील निकम गल्ली घाटे फॅब्रिकेशनच्‍या मागील गोडाऊनमध्‍ये मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे पशूवधगृह चालू असून तेथे आतापर्यंत सहस्रो गोवंशियांची हत्‍या करण्‍यात आली आहे. या ठिकाणाहून गेवराई पोलिसांनी काही गोवंशियांची सुटका करून त्‍यांना गोशाळेत पाठवलेले आहे, तर अनेक टन मांसही सापडलेले आहे. त्‍यामुळे हे अनधिकृत पशूवधगृह तात्‍काळ बंद करण्‍यात यावे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्‍या वतीने नगर परिषदेकडे देण्‍यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

निवेदनात म्‍हटले आहे की, गेवराई शहर हे दत्त महाराजांचे भिक्षा स्‍थान आहे. अशा पवित्र ठिकाणी सहस्रो गोवंशियांची हत्‍या होत आहे. त्‍यामुळे महाराष्‍ट्रातील दत्तभक्‍त आणि सकल हिंदु समाज यांच्‍या भावना दुखावल्‍या जात आहेत. त्‍यामुळे लवकरात लवकर कारवाई करून अवैध पशूवधगृह नष्‍ट करावे. अन्‍यथा मोठे आंदोलन उभे करण्‍यात येईल, याची नोंद घ्‍यावी. याचे पूर्ण दायित्‍व नगर परिषद प्रशासनाचे राहील, याची नोंद घ्‍यावी.

या निवेदनावर सर्वश्री श्‍याम गायकवाड (पाटील), बाबुराव गवारे, केशवराव पंडित, विलासराव खिसाडे, परमेश्‍वर सोळुंके, सखाराम कानगुडे, भागवत तवले, गोविंद निकम, गणेश निकम, राजेंद्र डाके (पाटील), उद्धव साबळे आणि सिद्धेश्‍वर डाके यांच्‍या स्‍वाक्षर्‍या आहेत.