छत्रपतींच्‍या इतिहासाचे ज्ञान हवेच !

‘सोनी’ मराठी वाहिनीच्‍या ‘कोण बनणार करोडपती ?’या प्रसिद्ध कार्यक्रमात एक शिक्षिका सहभागी झाल्‍या होत्‍या. पहिल्‍या ४ प्रश्‍नांची अचूक उत्तरे दिल्‍यानंतर सूत्रसंचालक खेडेकर यांनी त्‍यांना १० सहस्र रुपयांसाठी पाचवा प्रश्‍न विचारला, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्‍याभिषेक सोहळा कोणत्‍या किल्‍ल्‍यावर झाला ?’ या प्रश्‍नाच्‍या उत्तरासाठी त्‍यांना प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड आणि रायगड असे ४ पर्याय देण्‍यात आले होते. गणित विषयाच्‍या या शिक्षिका इतिहासातील एका प्रश्‍नाने गोंधळून गेल्‍या आणि त्‍यांनी या प्रश्‍नाच्‍या उत्तरासाठी ‘व्‍हिडीओ कॉल’च्‍या ‘लाईफलाईन’चे साहाय्‍य घेण्‍याचा निर्णय घेतला. कार्यक्रमात सहभागी झालेल्‍या त्‍या शिक्षिकेने विज्ञान शाखेत पदव्‍युत्तर शिक्षण घेऊन शिक्षक विषयाची पदवी घेतली आहे. असे असतांना शैक्षणिक अभ्‍यासक्रमातील एका साध्‍या प्रश्‍नाने त्‍या गोंधळल्‍या. चौथीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्‍ट्रात शालेय अभ्‍यासक्रमातून शिकवला जातो. ‘हा इतिहास केवळ परीक्षेतील प्रश्‍नांची उत्तरे लिहिण्‍याकरता शिकवला जातो का ?’, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्‍थित होतो.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यामुळेच आज महाराष्‍ट्रातील मंदिरांमध्‍ये देव आहेत ! त्‍यामुळे ते या महाराष्‍ट्र्रातील नागरिकांना देवाहून न्‍यून नाहीत ! अशा या महापुरुषांचा प्रेरणादायी जीवनपट महाराष्‍ट्रातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ज्ञात असणे आवश्‍यकच आहे. पाठ्यपुस्‍तकातील धडे मुलांना शिकवणे एवढेच शिक्षकांचे काम नसून देशाच्‍या भावी पिढीतील संस्‍कारक्षम आणि आदर्श नागरिक घडवण्‍याचे दायित्‍व त्‍यांचे असते. त्‍यासाठी शाळेत शिकवणार्‍या उच्‍चशिक्षित शिक्षकांचाच इतिहास असा कच्‍चा असेल, तर मुलांवर पराक्रमी इतिहासाचे संस्‍कार होणार तरी कसे ? गेल्‍या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती २ वेळा राज्‍यभरात उत्‍साहाने साजरे होतो. आता तर महाराजांचे राज्‍याभिषेक सोहळेही २ वेळा साजरे होऊ लागले आहेत. या संदर्भात वृत्तही प्रसिद्ध होत असतात. या शिक्षिका या केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहेत. असे समाजात लोकप्रतिनिधींसह अनेक लोक आहेत की, ज्‍यांना इतिहासाविषयी गांभीर्य नाही. ‘छत्रपती शिवराय नसते, तर सर्व जणांची सुंता झाली असती’, अशा छत्रपतींचा आदर्श कृतीत आणण्‍यासाठी प्रथम त्‍यांचा जीवनपट अभ्‍यासणे हे कर्तव्‍यच, तर शिक्षकांचे ते सर्वाधिक दायित्‍व आहे !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.