क्षमाशील असलेल्‍या आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करणार्‍या कोल्‍हापूर येथील सनातनच्‍या ७१ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) श्रीमती आशा दर्भे (वय ९४ वर्षे) !

निज श्रावण शुक्‍ल पक्ष पंचमी (२१.८.२०२३) या तिथीस पू. दर्भेआजींनी देहत्‍याग करून १ मास पूर्ण होत आहे. त्‍या निमित्ताने…

‘२२.७.२०२३ (अधिक श्रावण शुक्‍ल पक्ष पंचमी) या दिवशी पू. आईंनी (सनातनच्‍या ७१ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांनी) देहत्‍याग केला. त्‍याआधी साधारण १५ – १६ दिवस त्‍या झोपून होत्‍या. त्‍या कालावधीत आणि त्‍यांच्‍या समवेत रहातांना मला शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.

पू. (श्रीमती) आशा दर्भे

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. पू. दर्भेआजींनी स्‍वेच्‍छेपेक्षा आणि स्‍वतःच्‍या साधनेपेक्षा मुलाचा अधिक विचार करणे : वर्ष २०१७ – २०१८ मध्‍ये पू. आई गोव्‍याला आमच्‍याकडे आल्‍या होत्‍या. ‘त्‍यानंतर त्‍या गोव्‍यात आमच्‍याकडेच रहातील’, असे ठरले. त्‍याप्रमाणे त्‍या ६ मास आमच्‍याकडे राहिल्‍या. त्‍यानंतर पू. आईंच्‍या माहेरच्‍या नातेवाइकांपैकी एका वृद्ध नातेवाइकाला काही कारणांमुळे वृद्धाश्रमात रहायला जावे लागले. तेव्‍हा पू. आईंनी आम्‍हाला सांगितले, ‘‘मी माझ्‍या इच्‍छेने गोव्‍यात तुझ्‍याकडे (मुलगी श्रीमती अंजली कुलकर्णी हिच्‍याकडे) राहिले, तर येथे राहून माझी साधना होईल; पण ‘मी या वयात तुझ्‍याकडे रहाते’, यामुळे प्रसादला (पू. दर्भेआजींच्‍या मुलाला) वाईटपणा येऊन कुणी त्‍याला नावे ठेवली, तर ‘एक आई’ म्‍हणून माझ्‍यासाठी ते लाजिरवाणे आहे. त्‍यामुळे मी कोल्‍हापूरला प्रसादकडेच रहाणे योग्‍य आहे.’’ त्‍यानंतर पू. आई कोल्‍हापूरला परत गेल्‍या.

१ आ. संतांच्‍या संकल्‍पातील शक्‍तीची जाणीव होणे : त्‍यानंतर आम्‍ही (मी आणि माझी मुलगी अश्‍विनी हिने) अनेकदा पू. आईंचे आमच्‍या समवेत गोव्‍याला येण्‍यासाठी नियोजन केले; पण काही ना काही कारणांमुळे त्‍या गोव्‍याला येऊ शकल्‍या नाहीत. ‘सामान्‍य व्‍यक्‍तीने केलेल्‍या नियोजनापेक्षा संतांनी केलेला संकल्‍प सर्वश्रेष्‍ठ आणि दृढ असतो’, हे यातून मला शिकता आले. पू. आईंनी ‘मला आणि अश्‍विनीला काय वाटते ?’ किंवा ‘वैयक्‍तिक साधना आणि आध्‍यात्मिक उन्‍नती’ यांपेक्षा मुलाचा विचार केला अन् स्‍वेच्‍छेचा त्‍याग करून स्‍वतःची साधना केली. याविषयी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगितल्‍यावर त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘पू. आजी जिथे रहातील, तिथे त्‍यांची साधना होणारच आहे.’’ देवाने आम्‍हाला याची प्रचीतीही दिली.

१ इ. पू. दर्भेआजींमधील क्षमाशीलता आणि प्रीती !

१ इ १. कुणीही पू. दर्भेआजींना काही प्रतिक्रियात्‍मक बोलले, तरी त्‍याच्‍याशी प्रेमानेच बोलणार्‍या पू. दर्भेआजी ! : आमच्‍या कुटुंबियांपैकी एक व्‍यक्‍ती पू. आईंशी किंवा माझ्‍याशी बोलतांना पुष्‍कळ पूर्वग्रह ठेवून बोलत असे. भूतकाळातील अनेक प्रसंग मनात ठेवून ती व्‍यक्‍ती आमचे ‘मन दुखावेल’, असे बोलत असे. तेव्‍हाही पू. आई त्‍या व्‍यक्‍तीचे बोलणे मध्‍येच थांबवून ‘तुझे जेवण झाले का ? आधी जेवून घे’, असे त्‍या व्‍यक्‍तीला म्‍हणायच्‍या. पू. आईंच्‍या मनात त्‍या व्‍यक्‍तीविषयी कुठलीही प्रतिक्रिया नसे. पू. आई त्‍या व्‍यक्‍तीला लगेचच क्षमा करत असत आणि त्‍या व्‍यक्‍तीची प्रेमाने काळजीही घेत असे.

१ इ २. पू. दर्भेआजींची क्षमाशील वृत्ती शिकता येऊन प्रतिक्रिया न येता कृतज्ञताभाव जागृत होणे : पूर्वी ती व्‍यक्‍ती अद्वातद्वा बोलायची. तेव्‍हा मी तिला रागाने प्रत्‍युत्तर करायचे. त्‍यामुळे माझ्‍या मनात प्रतिक्रिया रहायच्‍या; मात्र या वेळी मला पू. आईंच्‍या क्षमाशीलतेच्‍या कृती आठवून ‘क्षमा करणे’ हा त्‍यांचा श्रेष्‍ठ गुण शिकता आला. त्‍या व्‍यक्‍तीचे बोलण्‍या-वागण्‍याचे प्रसंग लक्षात ठेवण्‍यापेक्षा ‘तिने पू. आईंची सेवा केली आणि त्‍यांना व्‍यवस्‍थित सांभाळले’, यांसाठी माझ्‍या मनात कृतज्ञताभाव जागृत झाला. मला त्‍या व्‍यक्‍तीला सहजपणे क्षमा करता आली. त्‍यामुळे माझ्‍या मनात त्‍या व्‍यक्‍तीविषयी कुठली प्रतिक्रिया राहिली नाही.

‘आपल्‍याशी कोण कसे बोलते-वागते ?’, यापेक्षा आपण सर्वांशी प्रेमभावानेच वागायला हवे’, हे मला पू. आईंकडून शिकता आले. पू. आईंच्‍या सहवासानेच हा पालट माझ्‍यात झाला, यासाठी मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञ आहे. पू. आईंनी केवळ कुटुंबियांनाच नाही, तर त्‍यांच्‍या जीवनात घडलेल्‍या सर्वच प्रसंगांत त्‍यांनी सर्वांनाच क्षमा केली आहे.

श्रीमती अंजली कुलकर्णी

२. पू. दर्भेआजींनी केलेले मार्गदर्शन !

२ अ. पू. दर्भेआजींना संत घोषित केल्‍यानंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आता पू. आजीच तुमच्‍या गुरु आहेत’, असे सांगून त्‍यांचे मार्गदर्शन घेण्‍यास सांगणे : वर्ष २०१७ मध्‍ये पू. आई संत घोषित झाल्‍या, तेव्‍हा मी  प.पू. गुरुदेवांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) विचारले, ‘‘मी साधनेसाठी कसे प्रयत्न करू ?’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘आता पू. आजीच तुमच्‍या गुरु आहेत. त्‍याच तुम्‍हाला मार्गदर्शन करतील.’’

२ आ. पू. दर्भेआजींनी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करायला सांगणे : त्‍यानंतर काही कालावधीने पू. आई कोल्‍हापूरला माझ्‍या भावाकडे गेल्‍या. एकदा मी त्‍यांना भेटायला कोल्‍हापूरला गेल्‍यावर त्‍यांनी मला सांगितले, ‘‘तू सतत ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप कर.’’ गुरुदेवांनी सांगितल्‍यानुसार ‘त्‍या माझ्‍या गुरु असून त्‍यांनीच मला तो ‘गुरुमंत्र’ दिला’, असे वाटून माझी भावजागृती झाली. तेव्‍हापासून माझा हा नामजप नियमित होतो.

२ इ. पू. दर्भेआजींनी आशीर्वाद देणे : कोरोनाचा दळणवळण बंदीचा कालावधी संपण्‍याच्‍या काही दिवस आधी त्‍यांनी मला आणि अश्‍विनीला सांगितले, ‘‘कोल्‍हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीची ओटी भरा आणि तिला पेढे अर्पण करा.’’ आम्‍ही तसे केल्‍यावर त्‍यांना पुष्‍कळ आनंद झाला. त्‍यांनी ‘आता तुमचे सर्व चांगले होईल’, असा आम्‍हाला आशीर्वाद दिला.

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितल्‍याप्रमाणे आज्ञापालन म्‍हणून पू. आईंनी आम्‍हाला गुरु म्‍हणून वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि आशीर्वादही दिला.

३. अनुभूती

३ अ. ‘पू. दर्भेआजींच्‍या समवेत नामजप करतांना सातत्‍याने शक्‍ती मिळत आहे’, असे जाणवणे : ‘पू. आई रुग्‍णाईत असतांना त्‍यांच्‍याजवळ बसून नामजप करतांना मला त्‍यांच्‍याकडून सातत्‍याने शक्‍ती मिळत आहे’, असे जाणवत होते. पुढे येणार्‍या प्रसंगांतून सावरण्‍यासाठी आणि देवाला अपेक्षित अशी साधना होण्‍यासाठी त्‍या मला सूक्ष्मातून शक्‍ती पुरवत होत्‍या. स्‍थुलातून पू. आजींचा केवळ श्‍वास चालू असला, तरी ‘सूक्ष्मातून त्‍या अनिष्‍ट शक्‍तींशी लढत असून संपूर्ण समष्‍टीला शक्‍ती पुरवत आहेत’, असे मला जाणवत होते. पू. आजींच्‍या देहत्‍यागानंतर सर्व विधी झाल्‍यावर मी तिथून (कोल्‍हापूर येथील माझ्‍या भावाच्‍या घरातून) निघून आमच्‍या घरी (फोंडा, गोवा येथे) आल्‍यानंतरही ती शक्‍तीची स्‍पंदने माझ्‍या समवेत आहेत’, असे मला जाणवले.

३ आ. पू. दर्भेआजींच्‍या दशक्रिया विधीच्‍या वेळी आलेल्‍या अनुभूती

३ आ १. पू. दर्भेआजींच्‍या दशक्रियाविधीच्‍या वेळी केलेल्‍या पिंडातही वात्‍सल्‍यभाव जाणवणे : पू. आईंच्‍या दशक्रिया विधीसाठी आम्‍ही पंचगंगा नदीच्‍या घाटावर गेलो होतो. तिथे माझ्‍या भावाने (श्री. प्रसाद भास्‍कर दर्भे यांनी) गुरुजींनी सांगितल्‍याप्रमाणे पू. आईंच्‍या पिंडाला तर्जनी आणि अंगठा याने बुक्‍का लावला. तेव्‍हा ‘त्‍या पिंडात वात्‍सल्‍यभाव जागृत झाला’, असे मला जाणवले. मी हात जोडले आणि माझ्‍याकडून सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘पू. आईंचे विधी तुम्‍हीच करून घ्‍या. पुढेही तुम्‍हीच त्‍यांना सांभाळणार आहात.’ माझी प्रार्थना होताक्षणीच पू. आईंच्‍या पिंडावर वाहिलेले फूल खाली पडले आणि तो पिंड पुष्‍कळ चैतन्‍यमय दिसू लागला. यासाठी माझ्‍याकडून गुरुदेवांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

३ आ २. पू. दर्भेआजींचा दशक्रिया विधी हा त्‍यांच्‍यासाठी आवश्‍यक नसून ‘इतरांच्‍या मनात कुठलीही शंका राहू नये’, यासाठी आहे’, असे जाणवणे : पू. आईंच्‍या दशक्रिया विधीच्‍या वेळी घाटावरील भिंतीवर एक कावळा आधीच येऊन बसला होता. विधी चालू झाल्‍यावर जिथे पू. आईंचे पिंडपूजन चालू होते, त्‍याच्‍या अगदी वर असलेल्‍या लोखंडी गजावर बसून तो खाली पहात होता. पिंडाचे पूजन झाल्‍यानंतर गुरुजींनी सांगितलेल्‍या ठिकाणी भावाने पिंड ठेवल्‍यावर १० सेकंदांच्‍या आत तो कावळा खाली येऊन पिंडाला शिवून गेला. तेव्‍हा देवाने माझ्‍या मनात विचार दिला, ‘पू. आई संत असल्‍याने त्‍या साधनेच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍यात आहेत. स्‍थुलातून त्‍यांच्‍यासाठी कुठलेे विधी केले किंवा केले नाही, तरी त्‍यांना देवाने पुढील गती दिलीच आहे. त्‍यामुळे ‘त्‍यांच्‍या पिंडाला कावळा शिवणे’, हे केवळ कुणाच्‍या मनात राहू नये’, यासाठी आहे.’

३ इ. पू. दर्भेआजींच्‍या देहत्‍यागानंतर आलेल्‍या अनुभूती

३ इ १. ‘पू. दर्भेआजींच्‍या देहत्‍यागानंतर कोल्‍हापूर येथील घरांत शक्‍ती आणि चैतन्‍य जाणवणे : पू. आईंनी माझ्‍या भावाच्‍या घरी देहत्‍याग केला. देहत्‍यागापूर्वी १५ दिवस आणि देहत्‍यागानंतरही त्‍यांच्‍याकडून मोठ्या प्रमाणात चैतन्‍य प्रक्षेपित होत होते. पू. आईंच्‍या देहत्‍यागानंतरचे तिचे सर्व विधी माझ्‍या भावाच्‍या घरी झाले असूनही कोल्‍हापूर येथील माझ्‍या सासरच्‍या घरीही मला मोठ्या प्रमाणात चैतन्‍य आणि शक्‍ती जाणवत होती. पू. आईंनी देहत्‍याग केल्‍यावर एखादे मंगलकार्य घडल्‍याप्रमाणे आमच्‍या घरी आनंद आणि शांती यांची स्‍पंदने जाणवत होती. ही अनुभूती आम्‍हाला घरी भेटायला आलेल्‍या साधकांनाही आली.

३ इ २. ‘गोवा येथील सदनिकेत चैतन्‍य आणि आनंद वाढला आहे’, असे जाणवून मन शांत होणे : पू. आईंचे सर्व विधी झाल्‍यानंतर मी आणि अश्‍विनी गोव्‍याला आलो. आम्‍ही रहात असलेल्‍या सदनिकेत प्रवेश करताच आम्‍हाला तिथेही चैतन्‍य आणि आनंद यांची स्‍पंदने जाणवली. पू. आई गोव्‍याला आल्‍या होत्‍या, तेव्‍हा त्‍या सुखासनावर एका विशिष्‍ट ठिकाणीच बसायच्‍या. ‘त्‍या स्‍थानाकडून माझ्‍याकडे निर्गुण चैतन्‍याचे प्रक्षेपण होत आहे’, असे जाणवून मला कृतज्ञताभावाने अश्रू आले. पू. आई बसत, त्‍या ठिकाणी बसल्‍यावर माझे मन पुष्‍कळ शांत झाले.

३ इ ३. सोफ्‍यावर उमटलेले ‘ॐ’ चिन्‍ह गडद होणे : सप्‍टेंबर २०२१ मध्‍ये गोवा येथील सदनिकेतील सोफ्‍यावर ‘ॐ’चे चिन्‍ह उमटले आहे. आम्‍ही पू. आईंचे विधी करून परत आल्‍यापासून ते चिन्‍ह पूर्वीपेक्षा गडद दिसत आहे.

४. पू. दर्भेआजींच्‍या अस्‍तित्‍वाने स्‍वतःमध्‍ये झालेले पालट !

अ. त्‍यांच्‍या सहवासात माझे मन अंतर्मुख झाले.

आ. माझा एकाग्रतेने नामजप होत होता.

इ. ‘माझ्‍यातील आसक्‍ती न्‍यून होत चालली आहे’, असे मला जाणवले.

ई. माझ्‍यातील कृतज्ञताभाव पुष्‍कळ वाढला आहेे.

उ. माझ्‍या मनाची स्‍थिती अत्‍यंत स्‍थिर आणि शांत झाली आहे.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव, आपल्‍या कृपेनेच आम्‍हाला पू. आईंचा सत्‍संग लाभला आणि त्‍यांची कृपा अनुभवता आली. आपल्‍याच कृपेने त्‍यांच्‍या गुणांतून शिकण्‍याची दृष्‍टी निर्माण झाली. आपणच आम्‍हाला त्‍यांचे गुण शिकवले. आमच्‍यातील स्‍वभावदोषांची तीव्रता न्‍यून करून आम्‍हाला आनंद दिला आणि साधनेची पुढील दिशा दिली. ‘पू. आईंकडून जे-जे शिकता आले, ते अंतर्मुख राहून आम्‍हाला आचरणात आणता येऊ दे आणि आपल्‍या चरणी आनंदाने साधनारत रहाता येऊ दे’, अशी आपल्‍या चरणी

कृतज्ञतापूर्वक प्रार्थना !’

– श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा. (वय ७३ वर्षे)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक