(म्हणे) ‘मणीपूर जळत असतांना पंतप्रधानांनी विनोद करत केलेले भाषण अयोग्य !’ – राहुल गांधी

काँग्रेसचे राहुल गांधी यांची पत्रकार परिषद !

राहुल गांधी

नवी देहली – मणीपूर जळत असतांना पंतप्रधानांनी लोकसभेत विनोद करत भाषण करणे अयोग्य आहे. हे पंतप्रधानपदाला शोभात नाही. मी १९ वर्षांपासून राजकारणात असून देशातील प्रत्येक राज्यात गेलो आहे; परंतु मणीपूर राज्याची स्थिती बिकट आहे. राज्य कुकी आणि मैतेई यांच्यामध्ये विभागले आहे. मणीपूरमधील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विविध पर्याय उपलब्ध असूनही ते हिंसाचार थांबवण्यासाठी काहीही करत नाहीत. ते मणीपूरला जात नाहीत, यामागे स्पष्ट कारणे आहेत. मी असे म्हणत नाही की, भारतीय सैन्याचे मणीपूरमध्ये पाचारण करण्यात यावे. मला एवढेच म्हणायचे आहे की, सैन्य राज्यात गेले, तर हिंसाचार २ दिवसांत अटोक्यात येईल, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या लोकसभेतील अविश्‍वास प्रस्तावाला दिलेल्या उत्तराच्या विरोधात देहली येथे ११ ऑगस्ट या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांधी बोलत होते.

१० ऑगस्टच्या सायंकाळी लोकसभेत अविश्‍वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदी उत्तर देत असतांना काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे खासदार यांनी बहिष्कार टाकला होता. त्यावरून गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.

अधीररंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षांचा संसदेबाहेर गोंधळ !

काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. यावरून संतप्त झालेल्या ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या गटाने संसदेबाहेर आंदोलन केले. निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत म्हटले की, चौधरी यांनी नीरव मोदी यांचे नाव घेण्यासारख्या छोट्याशा कृतीवरून त्यांना निलंबित करण्यात आले. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी ‘निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत’, असे सांगितले, तसेच या प्रकरणी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदही घेतली.

संपादकीय भूमिका

  • अविश्‍वास प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधानांचे मणीपूरवरील वक्तव्य न ऐकताच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकत संसद सोडून जाणे योग्य होते का ?