हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !

हिंदुत्व कधीही असत्याची बाजू घेत नाही. मग ती बाजू आपल्या आप्तस्वकियांची असो कि अन्य कुणाची ! सर्व प्रकारचे प्रयत्न आणि भगवान श्रीकृष्णाचीही शिष्टाई असफल झाल्यानंतर कौरव-पांडवांमध्ये युद्ध होण्याचे निश्चित झाले. युद्धापूर्वी धृतराष्ट्र आणि गांधारीचा ज्येष्ठ पुत्र दुर्याेधन विजयाचा आशीर्वाद मिळावा; म्हणून आई-वडिलांना नमस्कार करण्यासाठी आला. त्याला आशीर्वाद देतांना गांधारी म्हणाली, ‘‘यतो धर्मस्ततो जयः ।’’ स्वत:चा पुत्र असूनही पुत्रप्रेमाने आंधळे होत, माता गांधारीने दुर्याेधनाला विजयाचा आशीर्वाद दिला नाही, तर ‘जिकडे धर्म म्हणजे सत्य असेल’, त्या पक्षाचाच विजय होईल’, असा तिने आशीर्वाद दिला. गांधारी हे जाणत होती की, पांडवांचाच पक्ष सत्य आहे. त्यामुळे युद्धात त्यांचाच विजय होणार आहे. ‘आपल्या पुत्राचा पक्ष अधर्माचा असल्यामुळे धर्माचा पक्ष असणार्‍या पांडवांचाच विजय व्हावा’, अशी मनोमन अपेक्षा व्यक्त करण्याचा निष्पक्षपातीपणा म्हणजे हिंदुत्व ! ‘आपल्यापेक्षा वेगळे मत मांडणार्‍यांवर बळजोरी करून अथवा आमिषे दाखवून स्वतःचेच मत मान्य करण्यास त्यांना बाध्य करा, अन्यथा त्यांच्या हत्या करा, त्यांचे धर्म आणि ज्ञान यांचे भांडार असणारे ग्रंथ जाळा’, अशी शिकवण हिंदुत्व कधीही देत नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा हिंदुत्वाचा प्राण आहे.

१. चार्वाकांनाही हिंदुत्वाने सामावून घेतले !

हिंदूंमध्ये चार्वाक नावाचा एक विचारवंत होऊन गेला. तो नास्तिक असल्याने ईश्वर आणि पुनर्जन्म ही हिंदु धर्मातील तत्त्वे त्याला मान्य नव्हती. ‘खा, प्या आणि मजा करा’, अशा संकल्पनेचा तो समर्थक होता; म्हणून तो म्हणत असे – ‘यावत् जीवेत सुखं जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहः कुतः पुनरागमनम् ।’ अर्थ : ‘जितके आयुष्य असेल, तेवढे दिवस सुखाने जगा. ऋण (कर्ज) काढा; पण तूप प्या; कारण मृत्यूनंतर या देहाची राख झाल्यावर कुठला स्वर्ग आणि कुठला पुनर्जन्म ?’    तरीसुद्धा विचाराने उदार असणार्‍या हिंदुत्वाने नास्तिक असणार्‍या चार्वाकांनाही ऋषींचा दर्जा दिला. अशा विभिन्न विचारप्रवाहांना उदारपणे आपल्यात सामावून घेणे म्हणजे हिंदुत्व.

२. ‘साक्षात् गीताज्ञान देऊनही श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘तुला हवे तसे कर’, असे सांगणे’, हे हिंदुत्व !

‘माणसाने आपल्या जीवनात कसे जगावे ?’, याचे गुह्य ज्ञान देणारा जगातील एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता ! एकूण १८ अध्यायांतून अर्जुनाला जीवनाचे परमगुह्य ज्ञान दिल्यानंतरही शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया । विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ।’’ (अध्याय १८, श्लोक-६३, गीता)  अर्थ : ‘अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतीगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले आहे. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग तुला जसे आवडेल तसेच कर.’

एवढे परमगुह्य ज्ञान सांगूनही भगवान श्रीकृष्ण ‘मी सांगतो, तसाच विचार आणि आचार कर’, असे दडपण आणत नाही; उलट त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे विचार आिण आचार करण्याची मोकळीक देतो. अशा प्रकारे प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे विचार आणि आचाराचे स्वतंत्र्य देणे म्हणजे हिंदुत्व.

३. जीवनाच्या सर्व अंगाला व्यापणार्‍या समस्त वंशपरंपरांचा अभिमान बाळगणारे विशाल हिंदुत्व !

श्री. शंकर गो. पांडे

हिंदुत्वासाठी ‘हिंदुनेस’ असाही एक पर्यायी शब्द कुणी कुणी वापरतात. हिंदुत्व हे एखाद्या आकाशासारखे विशाल आहे. त्या आकाशात आपण जसजसे पुढे जाऊ तसतसे हिंदुत्वाच्या नवनवीन, तेजस्वी आणि पवित्र पैलूंचे दर्शन आपणास होत जाते. ‘हिंदुत्व’ या शब्दात हिंदूंच्या धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक इत्यादी अनेक अंगांचाही समावेश होतो. आपल्या गौरवशाली वंशपरंपरांचा  सार्थ अभिमान बाळगत भविष्याचा वेध घेत कालमानानुसार आपल्यात योग्य ते पालट करून घेत सदैव नित्यनूतन रहाणार्‍या सनातन धर्माचा अभिमान बाळगणे म्हणजे हिंदुत्व ! आपल्या देवीदेवतांचा, ऋषिमुनींचा, साधू-संतांचा, पराक्रमी आणि थोर पुरुषांचा या सर्वांनी प्रस्थापित केलेल्या आदर्शांचा, त्यांनी निर्माण केलेले साहित्य, संगीत, १४ विद्या, ६४ कला, विविध सण-उत्सवांचा, मानवाच्या केवळ कल्याणासाठीच त्यांनी लावलेल्या विविध वैज्ञानिक शोधांचा, गाय, गोपी (नारी), गंगा, गायत्री आणि गीता यांना माता मानून या सर्वांविषयी मनात आदर आणि अभिमान बाळगणे अन् या सर्वांच्या रक्षणासाठी सदैव कटीबद्ध असणे म्हणजे हिंदुत्व; पण प्रसंगी धर्मातील अनिष्ट रूढी, चालीरीती, अंधश्रद्धा नाकारणे म्हणजेही हिंदुत्वच आहे !

४. व्यष्टी, समष्टी, सृष्टी यांचा उत्कर्ष साधून परमेष्टी (मोक्ष) साधणारे ते हिंदुत्व !

मानवी जीवन सार्थकी लागावे; म्हणून ४ आश्रम (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास) आणि ४ पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष) अशी व्यवस्था निर्माण करणारी जीवनशास्त्र म्हणजे हिंदुत्व. स्वतःसह म्हणजे (व्यष्टी), समाज (समष्टी) आणि निसर्ग (सृष्टी) यांचे कल्याण अन् उत्कर्ष साधून अंती मोक्ष (परमेष्टी) प्राप्त करणारी जीवनपद्धत म्हणजे हिंदुत्व. असुरांच्या म्हणजे दुष्टांच्या नाशासाठी देवांना आपल्या हाडांपासून ‘वज्र’ नावाचे अमोघ शस्त्र सिद्ध करता यावे; म्हणून महर्षि दधिची यांनी मृत्यूला कवटाळले. देवांच्या म्हणजे सुष्टांच्या रक्षणासाठी असा सर्वाेच्च त्याग करणे म्हणजे हिंदुत्व. स्वतःच्या राज्याभिषेकाची मंगल घटिका समीप आलेली असतानांही अचानक सावत्र आईला आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनांचे पालन करण्यासाठी क्षणात सर्व सत्ता आणि सुखसाधनांचा मोह सोडून प्रभु श्रीरामचंद्राने वल्कले नेसून १४ वर्षे आनंदाने वनगमनासाठी हसत निघणे म्हणजे हिंदुत्व. त्याच क्षणाला श्रीरामासह जानकी आणि लक्ष्मण यांनीही आपला पत्नी अन् बंधू धर्म निभावण्याचा निर्णय घेणे म्हणजे हिंदुत्व. श्रीराम वनवासात गेल्यावर भरताने श्रीरामाच्या पादुका अयोध्येच्या सिंहासनावर ठेवून आणि राजधानीबाहेर १४ वर्षे व्रतस्थ रहून श्रीरामाच्या नावाने राज्यकार्यभार सांभाळणे म्हणजे हिंदुत्व. महाबली रावणाचा वध  केल्यानंतर त्याच्या सुवर्ण लंकेच्या मोहात न पडता ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।’ (अर्थ : माता आणि मातृभूमी यांचे स्थान स्वर्गाहूनही वर आहे.) म्हणून लंकेच्या सिंहासनावर बिभिषणाचा राज्याभिषेक करणे म्हणजे हिंदुत्व. रावणाचा वध केल्यानंतर ‘मरणान्तानि वैराणि’ म्हणजे ‘शत्रू असला, तरी त्याच्या मृत्यूनंतर वैर संपते.’ या उदात्त न्यायाचे पालन करून रावणाचा अंत्यविधी श्रीरामाने सन्मानपूर्वक करणे म्हणजे हिंदुत्व. अन्यायी वालीचा वध केल्यानंतर किष्किंधेच्या राजसिंहासनावर सुग्रीवाचा आणि युवराज म्हणून वालीपुत्र अंगद याचा राज्याभिषेक करणे म्हणजे हिंदुत्व !

५. बळजोरीने राज्य बळकावणारे नव्हे, तर ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ करणारे हिंदुत्व !

कोणत्याही देशावर बलपूर्वक आक्रमण करून तेथील लोकांना गुलाम बनवणे, तलवारीच्या बळावर धर्मांतर करणे, त्यांची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करणे अशी अमानुषता आणि रानटीपणा यांची हिंदुत्वाने कधी कल्पनाही केली नव्हती अन् आजही करत नाही; म्हणूनच शेकडो देशांत आजही हिंदु संस्कृतीच्या आणि सभ्यतेच्या पाऊलखुणा सहस्रोंच्या संख्येने आढळून येतात. हिंदूंनी आपला धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार अन् प्रसार कधीही शस्त्र किंवा प्रलोभन यांच्या बळावर केला नाही. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ म्हणजे ‘सर्व जगाला आर्य अर्थात् सभ्य, सुसंस्कृत आणि उन्नत बनवणे’, हेच अनादी काळापासून हिंदूंचे ध्येय होते अन् आजही आहे.

हिंदूंनी दुसर्‍यांच्या राज्यांचा कधी लोभ धरला नाही. भगवान श्रीकृष्णाने मथुरेचा राजा आणि आपला सख्खा मामा असणार्‍या कंसाचा वध केला होता; कारण कंस अत्याचारी होता. त्याने त्याच्या िपत्याला कारागृहात टाकून राज्य बळकावले होते. स्वतःच्या बहिणीच्या ६ पुत्रांना जन्मताच दगडावर आपटून ठार मारले होते. अशा दुष्ट कंसाचा वध करून मथुरेच्या राजसिंहासनावर स्वतः न बसता कंसाचा पिता महाराज उग्रसेन यांना बसवले. मगधचा क्रूर राजा जो कंसाचा सासरा होता, त्या जरासंधाचा वध करून त्याचा पुत्र सहदेवाला मगधचा राजा बनवले.

प्रागज्योतिषपूरचा नराधमी (जुलमी) राजा नरकासुराचा वध करून त्याचा पुत्र भगदत्ताच्या हाती राज्य कारभार सोपवला. ‘दुसर्‍यांच्या भूभागाचा मोह न धरणे’ हे हिंदुत्वाचे पूर्वापार एक व्यवच्छेदक असे एक लक्षण आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेतून हिंदुत्वाच्या वरील लक्षणाचे प्रगटीकरण मोठ्या प्रभावी आणि नेमकेपणाने झाले आहे. त्यांच्या कवितेत वाजपेयी म्हणतात,

‘राम और गोपाल के नामपर मैंने कब अत्याचार किया ।
अखिल विश्व को हिंदु करने मैंने कब नरसंहार किया ।
कोई बतलावे मुझसे काबुल में जाकर मैंने कितनी मस्जिदें तोडी ।
भूभाग नहीं शतकोटी हृदय जितने का मेरा निश्चय ।
हिंदु तन-मन हिंदु जीवन रग रग हिंदु मेरा परिचय ।।’

या कवितेतील वास्तविकता कोण नाकारू शकेल ?

६. स्त्रियांचा सन्मान करणारे हिंदुत्व !

स्त्रियांचा सन्मान करणे म्हणजे हिंदुत्व. स्त्रियांना लुटीचा माल समजून त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांना जनानखान्यात कोंडणे, त्यांची गुलाम म्हणून विक्री करणे, हे हिंदुत्वाच्या कल्पनेतही कधी नव्हते आणि ते कळल्यावरसुद्धा तेव्हाही हिंदुत्वाने मान्य केले नाही अन् आजही करत नाही. नरकासुराच्या कारागृहातून १६ सहस्र स्त्रियांची मुक्तता करून श्रीकृष्णाने त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि त्यांना सन्मान दिला. कल्याणच्या प्रांताधिकार्‍याचा (सुभेदाराचा) पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सरदार आबाजी सोनदेव यांनी हाती आलेल्या सुभेदाराच्या तरुण आणि सुंदर सुनेला छत्रपती शिवरायांच्या राजसभेत भेट म्हणून उपस्थित केले. आबाजींना वाटले, ‘ही भेट पाहून राजे हर्षित (प्रसन्न) होतील. आपल्याला घसघशीत बक्षीस देतील’; पण झाले उलटेच. महाराजांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ‘यापुढे स्त्री मग ती स्वकीय असो कि परकीय तिचा मानभंग (बेअब्रू) होता कामा नये, तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये’, असा सक्त आदेश महाराजांनी आपल्या सर्व सेनानी आणि सैनिक यांना दिला. प्रांताधिकार्‍याच्या सुनेची खणानारळाने ओटी भरून तिला सन्मानाने तिच्या पतीकडे पाठवून दिले.

हिंदूंनी स्त्रियांना नेहमीच आपल्या समतुल्य किंबहुना अनेकदा आपल्यापेक्षाही वरचे स्थान दिले आहे. पुरातन काळापासूनच या देशात स्त्रियांना सर्वच क्षेत्रांत स्वातंत्र्य दिले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आणि प्रतिभेला बुरख्याच्या बंधनात जखडण्याची कल्पनाही कधी हिंदूंच्या मनाला शिवली नाही. हिंदु धर्मात केवळ पुरुषांचेच नव्हे, तर देवांचे अस्तित्वसुद्धा शक्तीविना अर्धवट मानले गेले आहे. श्रीविष्णु म्हटले की लक्ष्मी, श्रीकृष्ण म्हटले की रुक्मिणी, श्रीराम म्हटले की सीता, शिव म्हटले की पार्वती यांच्या प्रतिमा डोळ्यांसमोर उभ्या रहातात. प्राचीन काळात गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, अनसुया, अरुंधती या विदुषी स्त्रिया त्यांच्या विद्वत्तेसाठी  विख्यात होत्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांचे प्रातःकाळी स्मरण करणे पुण्यकारक समजले जाते. माता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नमा, राणी दुर्गावती अशा कितीतरी पराक्रमी स्त्रियांची नावे हिंदूंच्या इतिहासात चिरस्थायी नोंदली गेली आहेत. आजही अनेक हिंदु स्त्रिया त्यांच्या कर्तृत्वाने देशविदेशात आणि सर्वच क्षेत्रांत झळकत आहेत. अशा प्रकारे स्त्रियांना सन्मान आणि समान संधी देणे म्हणजे हिंदुत्व !

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.