‘पृथ्वीवरील अमृत आणि संजीवनी, म्हणजे गुळवेल वनस्पती. ‘ही गुळवेल वनस्पती किती गुणकारी आहे !’, याचे ज्ञान मला माझे वडील (कै.) दाजीकाका पेंडसे यांच्यामुळे मिळाले. माझे वडील त्या काळातील आयुर्वेद जाणणारे उत्तम वैद्य होते. ते आयुर्वेदाची औषधे बनवणार्या अनेक आस्थापनांना कच्चा माल पुरवत असत. ते घरी च्यवनप्राश, माका तेल, ब्राह्मी तेल, दंतमंजन, त्रिफळा चूर्ण, गुळवेल सत्त्व आणि आवळ्याचे औषधी पदार्थ सिद्ध करत असत. त्यांच्याकडून औषधे घेतल्याने बरे झालेले अनेक रुग्ण मी पाहिले आहेत. त्यांच्यामुळे मला आयुर्वेदाचे थोडेफार ज्ञान झाले.
१. गुळवेलीची अन्य नावे
गुळवेल वनस्पतीला ‘गिलोय, अमृता, अमृतवेल, अमरवेल, संजीवनी’, अशा अनेक नावांनी ओळखतात.
२. गुळवेल वनस्पतीच्या उत्पत्तीविषयी रामायणातील आख्यायिका !
या वनस्पतीच्या उत्पत्तीविषयी रामायणामध्ये एक आख्यायिका आहे. राम-रावण यांच्या युद्धात जेव्हा अनेक वानर मृत्यूमुखी पडले, तेव्हा इंद्रदेवाने आकाशातून अमृताचा वर्षाव केला आणि वानरांना जिवंत केले. त्या अमृताचे थेंब पृथ्वीवर जेथे जेथे पडले, तेथे तेथे ही गुळवेल निर्माण झाली.
३. अमरवेल गुळवेल
या वनस्पतीची वैशिष्ट्ये, म्हणजे ही वनस्पती ज्या ठिकाणी लावली जाते, तेथे ती पुनःपुन्हा उगवते. ती कधीही नष्ट होत नाही; म्हणूनच ती अमरवेल आहे. सर्वांनी आपल्या घरात, दारात किंवा एखाद्या कुंडीत गुळवेल वनस्पती लावून तिचा लाभ घेऊया.
४. गुळवेलीचे उपयोग
अ. रोगप्रतिकार शक्ती वाढणे
आ. मधुमेहामध्ये वाढलेली साखर न्यून करणे
इ. उच्च रक्तदाब नियंत्रित करणे
ई. सर्व प्रकारच्या तापावर गुणकारी
उ. वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन साधणे
ऊ. गुडघेदुखी आणि संधिवात यांमध्ये गुणकारी
ए. खोकला आणि डोळ्यांचे विकार यांवर अतिशय गुणकारी
ऐ. सध्या विषाणूजन्य आजारांमध्ये अनेक जणांच्या रक्तातील लाल आणि पांढर्या पेशी न्यून होतात. गुळवेलीचा रस यासाठी फार उपयोगी आहे. त्याच्या सेवनाने पेशींची संख्या वाढायला साहाय्य होते.
५. गुळवेल कुणी सेवन करू नये ?
गरोदर स्त्रिया, ५ वर्षांखालील बालके, तसेच ज्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर प्रमाणापेक्षा न्यून आहे, अशांनी गुळवेलीचे सेवन करू नये.
६. गुळवेल वापरून करता येणारी औषधे
६ अ. गुळवेलीचा काढा : एका व्यक्तीसाठी ६ – ७ इंच उंचीची गुळवेलीची कांडी (ओली किंवा सुकलेली) घेऊन तिचे ५ – ६ लहान तुकडे करावेत. हे तुकडे एका पेलाभर पाण्यात घालून उकळावेत. पाणी अर्धे होईपर्यंत हे मिश्रण उकळावे. थंड झाल्यावर हा काढा गाळणीने गाळून घ्यावा. हा काढा दिवसातून एकदा ५० मि.ली. (अर्धा कप) घ्यावा.
६ अ १. उपयोग : या काढ्याच्या सेवनामुळे कोणत्याही प्रकारचा ताप न्यून होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.
६ आ. गुळवेल सत्त्व : गुळवेलीच्या ओल्या कांड्या ठेचून त्या पाण्यात घालून हाताने कुस्कराव्यात. हे मिश्रण अनुमाने ७ – ८ घंटे तसेच ठेवून द्यावे. नंतर त्यातील गुळवेलीचा चोथा काढून टाकून द्यावा आणि राहिलेले पाणी तसेच ठेवावे. दुसर्या दिवशी पाण्यामध्ये गुळवेलीचा साका (गाळ) खाली साठलेला दिसेल. वरील पाणी टाकून देऊन खाली राहिलेला साका घ्यावा आणि तो उन्हात खडखडीत वाळवावा. हा वाळलेला साका म्हणजेच गुळवेल सत्त्व होय.
६ आ १. उपयोग : शरिरातील कडकी (उष्णता) दूर होऊन रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी या सत्त्वाचा उपयोग होतो.
६ आ २. बाळगायची सावधगिरी : या सत्त्वाचे सेवन अतिशय अल्प प्रमाणात आणि शक्यतो वैद्यकीय सल्ल्यानेच करावे.
६ इ. गुळवेल चूर्ण : गुळवेलीच्या कांड्या घेऊन त्यांचे तुकडे करावेत. ते तुकडे उन्हात खडखडीत वाळवावेत. वाळलेल्या कांड्या कुटून त्यांची पूड करावी. ही पूड म्हणजे गुळवेल चूर्ण.
६ इ १. उपयोग : हे चूर्ण शरिरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन राखते.
६ ई. गुळवेलीच्या पानांचा लेप : गुळवेलीची हिरवी पाने घेऊन ती वाटून त्यांचा रस काढावा. या रसात हळद घालून त्याचा लेप सिद्ध करावा.
६ ई १. उपयोग : हा लेप त्वचा रोगात शरिरावर जेथे कंड येत असेल, त्या भागावर लावल्यास आराम पडतो.
अशी ही बहुगुणी गुळवेल आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत लाभदायी आहे. खरोखर ही नावाप्रमाणेच असणारी अमृतवेल फार गुणकारी आहे.’
– श्रीमती शीतल जोशी, सनातन आश्रम, मिरज. (२९.१.२०२१)