भारताकडून भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी !

चीनमधून येतात बहुतांश वस्तू !

( टॅबलेट म्हणजे छोटा आधुनिक संगणक)

नवी देहली – भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. केवळ योग्य अनुज्ञप्ती (परवाना) असलेल्यांना मर्यादित वस्तूंसाठी आयातीची अनुमती देण्यात येईल. अशा वस्तू विकण्याची अनुमती नसेल, तसेच वापरानंतर या वस्तू नष्ट कराव्या लागतील अथवा त्यांची निर्यात करता येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

१. भारताने हा निर्णय ‘मेक इन इंडिया’ (भारतामध्ये योजनेला प्रोत्साहन देण्यासाठीची योजना) घेतला असल्याचे सांगितले जात आहे. भारतात भ्रमणसंगणक, संगणक आणि टॅबलेट बहुतांश चीनमधून आयात केले जातात. सरकारच्या या निर्णयामुळे या वस्तूंच्या मूल्यांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२. ‘मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी’चे माजी महासंचालक अली अख्तर जाफरी यांनी म्हटले की, सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील निर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल. हा एक सकारात्मक निर्णय आहे. आम्ही याचे स्वागत करतो.