गोवा पावसाळी अधिवेशन : रोजगार निर्मितीमध्ये विसंगती असल्याच्या कारणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले

गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशन

पणजी, २१ जुलै (वार्ता.) – गोवा विधानसभेत २१ जुलैला गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने संमती दिलेल्या प्रकल्पांवर चर्चा झाली. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने(आय.पी.बी. – इनव्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डने) मान्यता दिलेल्या विविध आस्थापनांमध्ये २ सहस्र ८९९ गोमंतकीय आणि ४ सहस्र ५४ परप्रांतीय यांना रोजगार मिळाला आहे आणि काही प्रकल्पांचे काम अद्याप चालू व्हायचे आहे, अशी माहिती दिली, तर उद्योगमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, ‘‘आतापर्यंत १० सहस्र ८३२ जणांना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पांमध्ये रोजगार मिळालेल्यांपैकी ४५ टक्के गोमंतकीय आहेत. ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’

उद्योगमंत्री माविन गुदिन्हो

यावर विरोध पक्षाच्या नेत्यांनी रोजगार निर्मितीच्या आकडेवारीमध्ये विसंगती असल्याविषयी सरकारला धारेवर धरले. परप्रांतियांना अधिक रोजगार दिल्यावरून ‘सत्ताधार्‍यांना गोमंतकियांची चिंता नाही’, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

गेल्या ९ मासाने प्रकल्पांतील गुंतवणूक प्रस्तावित रकमेच्या १४.२२ टक्के ! – माविन गुदिन्हो

गेल्या ९ वर्षांत म्हणजे वर्ष २०१४ ते वर्ष २०२३ या कालावधीत गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने २५९ प्रकल्पांना मान्यता दिली आणि त्यासाठी प्रस्तावित गुंतवणूक १९ सहस्र ४२१ कोटी रुपये आहे आणि रोजगार क्षमता ५४ सहस्र २५२ आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात आतापर्यंत राज्यात २ सहस्र ७६२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ही रक्कम प्रस्तावित रकमेच्या १४.२२ टक्के आहे, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिली.