गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – १६ जुलैला मुंबईत घाटकोपर येथे पू. संभाजीराव भिडेगुरुजी बैठकीसाठी पोचत असतांना काही समाजकंटक त्यांच्या गाडीपुढे आडवे आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. गेल्या अनेक दिवसांपासून काही संघटना पू. गुरुजींचे विचार जाणून न घेता त्यांना अकारण विरोध करत आहेत, तसेच केवळ वैयक्तिक द्वेषापोटी समाजात तेढ निर्माण होईल, असे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करत आहेत. तरी समाजकंटकांकडून अनुचित कृत्य घडू नये आणि त्यातून कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यांसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना महाराष्ट्रात अन् राज्याबाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवावी, या मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गडहिंग्लज येथे प्रांत कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार विष्णु बुट्टे यांनी स्वीकारले.
यात म्हटले आहे की, पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे कोणत्याही टिकेला, विरोधाला न जुमानता ध्येयपूर्ततेसाठी मार्गक्रमण करत असतात; पण काही समाजकंटकांना पू. भिडेगुरुजी हे पूर्णपणे न समजल्यामुळे गुरुजींचे वाढणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य सतत बोचत रहाते. घाटकोपर येथील प्रसंग त्यातीलच होता. असे प्रसंग वारंवार घडतच आहेत. हे प्रसंग घडवून कुणीतरी त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न, तर करत नाही ना ? अशी शंका येत आहे. तरी याची तात्काळ नोंद घेण्यात यावी.
या प्रसंगी धारकरी सर्वश्री आप्पा उपाख्य सुधीर शिवणे, सागर कुराडे, मनोज पोवार, राहुल शिंदे, शिवाजी पाटील, मंथन भडगावकर, प्रताप मोहिते, सुदर्शन चव्हाण, मिलिंद गोरे, विनोद मोहिते यांसह अन्य उपस्थित होते.