देशातील १५ राज्यांमध्ये पूरसदृश स्थिती !

नवी देहली – देशात मोसमी पावसाचे आगमन होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. देशातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील कोकण, तसेच गोवा राज्यात चांगला पाऊस पडला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यांत सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. देशातील सुमारे १५ राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. यामध्ये उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, देहली, झारखंड, बंगाल, ओडिशा, गुजरात, तेलंगाणा, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा  समावेश आहे.

देशात १ जून ते १८ जुलैपर्यंत ३२१.८ मिमी पाऊस पडला. उत्तर भारतात पावसामुळे यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून आगर्‍याच्या ताजमहालापर्यंत तिचे पाणी पोचले आहे. त्याच वेळी १२ राज्यांमधील २१ जिल्ह्यांमध्ये मात्र ६० टक्यांपर्यंत पावसाची कमतरता आहे. बिहारमधील २९, उत्तरप्रदेशातील २५, महाराष्ट्रातील १८, कर्नाटकातील १७ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडला आहे.