सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना प्रवेश अर्ज अल्‍प !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ७८ पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांतील २५ पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांसाठी केवळ ३३४ विद्यार्थ्‍यांनी प्रवेश केले आहेत. त्‍यातून विद्यापिठातील शैक्षणिक विभागातील अभ्‍यासक्रमांच्‍या प्रवेशासाठीच्‍या प्रवेश अर्जांमध्‍ये घट झाल्‍याचे दिसून येत आहे. यावर्षी ७८ पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांसाठी १४ सहस्र ४४२ प्रवेश अर्ज आल्‍याचे समजते. जे गतवर्षीपेक्षा ४ सहस्र अर्जांनी अल्‍प आहेत. प्रवेश अर्जाची अंतिम समयमर्यादा ८ जुलै होती.

यंदा पदवी आणि एकात्‍मिक अभ्‍यासक्रमांची प्रवेश परीक्षा झाली आहे. त्‍यातील गुणांच्‍या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवण्‍यात येईल. अभ्‍यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा २२ ते २४ जुलै या दिवशी होणार असल्‍याचे विद्यापिठाच्‍या संकेतस्‍थळावर नमूद करण्‍यात आले आहे. विद्यापिठातील नियमित अभ्‍यासक्रमांना विद्यार्थ्‍यांचा प्रतिसाद कायम आहे; मात्र काही अभ्‍यासक्रम नवीन असल्‍याने पारंपरिक अभ्‍यासक्रमांपेक्षा वेगळे असल्‍याने त्‍यांना प्रतिसाद अल्‍प आहे. पदव्‍युत्तर पदवी प्रवेशांसाठी मुदतवाढ देण्‍याचा विचार असल्‍याचे विद्यापिठांकडून सांगण्‍यात येत आहे.

संपादकीय भूमिका :

पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये प्रवेश अर्ज अल्‍प का आले आहेत ? हे विद्यापीठ प्रशासनाने शोधणे आवश्‍यक !