मुसलमानांना विदेशातील सुरक्षेसंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून देणे आवश्‍यक !

पिंपरी (पुणे) येथे ‘समान नागरी कायदा’ या विषयावरील व्‍याख्‍यानात महाराष्‍ट्र-गोवा बार कौन्‍सिलचे माजी सदस्‍य अधिवक्‍ता नंदू फडके यांचे मत !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – अल्‍पसंख्‍यांक समुदायाला भडकवण्‍यासाठी समान नागरी कायद्याविषयी जाणूनबुजून अपसमज निर्माण केले जात आहेत. वास्‍तविक देशाच्‍या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्‍यक असलेल्‍या समान नागरी कायद्याविषयी विरोधकांचे प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. यासह मुसलमानांना विदेशातील सुरक्षासंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून दिली पाहिजे, असे मत महाराष्‍ट्र-गोवा बार कौन्‍सिलचे माजी सदस्‍य अधिवक्‍ता नंदू फडके यांनी व्‍यक्‍त केले. ते पिंपरीतील दिवाणी आणि फौजदारी न्‍यायालयाच्‍या सभागृहात ‘पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्‍होकेट्‌स बार असोसिएशन’च्‍या वतीने ‘समान नागरी कायदा’ या विषयावर आयोजित व्‍याख्‍यानात बोलत होते. बार असोसिएशनचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता नारायण रसाळ यांच्‍या संकल्‍पनेतून व्‍याख्‍यानमालेचे आयोजन केले होते.

अधिवक्‍ता फडके पुढे म्‍हणाले की, समान नागरी कायदा हा विषय विधी अभ्‍यासकांसाठी जवळचा आणि जिव्‍हाळ्‍याचा आहे. खरे म्‍हणजे त्‍या काळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समान नागरी कायद्याची अनिवार्यता मांडली होती. त्‍याचवेळी या कायद्याची कार्यवाही केली असती, तर देशाची प्रगती आधीच झाली असती.

या वेळी उपस्‍थित अधिवक्‍ता गोरडे म्‍हणाले की, विधी आयोगाने समान नागरी कायद्याच्‍या कार्यवाहीसाठी सूचना मागवल्‍या असून त्‍याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभत आहे.