मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांत ६१ टक्के पदे रिक्त !

मुंबई विद्यापिठात ६१ % पदे रिक्त

मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांमधील तब्बल ६१ टक्के पदे रिक्त आहेत. एकूण ३६८ संमत पदांपैकी २२६ पदे रिक्त असून केवळ १४२ प्राध्यापक विद्यापीठ सांभाळत आहेत.

सध्या विद्यापिठातील विविध ३४ विभागांमध्ये शासनाकडून प्राध्यापकांची ८७, साहाय्यक प्राध्यापकांची १२१ आणि सहयोगी प्राध्यापकांची १६० पदे संमत करण्यात आली आहेत. त्यांपैकी प्राध्यापकांची १५ पदे भरली असून ७२ पदे रिक्त आहेत. साहाय्यक प्राध्यापकांची ४० पदे भरली असून ८१ पदे रिक्त आहेत, तर सहयोगी प्राध्यापकांची ८७ पदे भरलेली असून ७३ पदे रिक्त आहेत.

समाजशास्त्र, राज्यशास्त्र, आफ्रिकन स्टडीज, युरेशियन स्टडीज, स्टॅटिस्टिक्स, मानसशास्त्र, विधी, संस्कृत, भाषाशास्त्र, रशियन, अरेबिक, पर्शियन, हिंदी, शिक्षणशास्त्र, सिंधी, भूगोल, संगीत, कन्नड, वाणिज्य, उर्दू आणि प्रा. बाळ आपटे केंद्र या २१ विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. माजी अधिसभा सदस्य संजय वैराळे यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्‍नांमधून विद्यापिठाची ही स्थिती उघड झाली आहे.

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांतील १३६ शिक्षकांची पदे भरण्यास शासनाकडून संमती मिळाली आहे. पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

यास उत्तरदायी असलेल्यांचे पद सरकारने रिक्त करायला हवे , म्हणजेच त्यांची हकालपट्टी करायला हवी !