जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात वस्रसंहिता लागू : स्कर्ट किंवा जीन्स घालण्यास बंदी !

जम्मू – जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध ‘बावे वाली माता’ मंदिराच्या व्यवस्थापनाने भाविकांसाठी वस्रसंहिता निश्‍चित केली आहे. जम्मू शहरात पहिल्यांदाच असा नियम बनवून त्याचा फलक श्री काली मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. या अंतर्गत भाविकांना मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी सभ्य कपडे घालण्याचे आणि डोके झाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासह ‘हाफ पँट’, ‘मिनी स्कर्ट’, फाटलेल्या जीन्स आणि ‘कॅप्री पँट’ यांवरही बंदी घालण्यात आली आहे.

यासंदर्भात मुख्य पुजारी महंत बिट्टा यांनी सांगितले की, मंदिरात येणार्‍या सर्व भाविकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी मंदिराला सहलीचे ठिकाण (पिकनिक स्पॉट) बनवल्याने आम्ही हे पाऊल उचलले आहे. जम्मू-काश्मीर धर्मादाय विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर आर्.एस्. लंगेह यांनी सांगितले की, इतर मंदिरांनाही असेच पाऊल उचलायचे असेल, तर या विषयावर चर्चा झाली पाहिजे. उत्तरप्रदेशातून श्री कालीमातेच्या दर्शनासाठी आलेले भक्त श्री. धनंजय पाटील म्हणाले, ‘हिंदु संस्कारांच्या पुनरुज्जीवनासाठी हे एक चांगले पाऊल आहे.’ दुसरी एक भक्त मनमीत कौर म्हणाल्या, ‘मी या निर्णयाचे स्वागत करते. या आदेशाची पूर्ण कार्यवाही (अंमलबजावणी) झाली पाहिजे.’

संपादकीय भूमिका

मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्‍या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !