ज्ञानवापीतील शिवलिंगाचे लवकरात लवकर परीक्षण व्हावे ! – हिंदु याचिकाकर्त्यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीतील शिवलिंगाची लवकरात लवकर वैज्ञानिक चाचणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. या संदर्भात त्यांचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांना पत्र लिहिले आहे.

१२ मे या दिवशी अलहाबाद उच्च न्यायालयाने शिवलिंगाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून परिक्षण करून घेण्याचा आदेश दिला होता. त्याला मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने याला अंतरिम स्थगिती दिली होती, तसेच यावर पुढील सुनावणी ६ जुलै या दिवशी करण्याचे म्हटले होते; मात्र ६ जुलै या दिवशी यावर सुनावणी झाली नाही. त्यामुळेच अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वोच्च न्यायालयाला वरील पत्र लिहिले आहे.