चि. सर्वेश निवृत्ती कुंभार याला ४ थ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद!
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. सर्वेश निवृत्ती कुंभार हा या पिढीतील एक आहे !
आषाढ कृष्ण प्रतिपदा (४.७.२०२३) या दिवशी बसुर्ते (बेळगाव) येथील चि. सर्वेश निवृत्ती कुंभार याचा ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. ‘पोटातील बाळाचे वजन अधिक असल्यामुळे नैसर्गिक प्रसुती कशी होईल ?’, या गोष्टीची चिंता वाटणे : ‘मी सर्वेशच्या वेळी प्रसुतीसाठी रुग्णालयात गेले होते. बाळाची वाढ माझ्या पोटामध्ये चांगली झाली होती. ‘सोनोग्राफी’मध्ये बाळाचे वजन ३.५ किलो इतके होते. त्यामुळे ‘माझी प्रसुती व्यवस्थित होईल कि नाही ?’, या विचाराने मी रडत होते. तेव्हा माझे पती श्री. निवृत्ती कुंभार तेथे आले. त्यांनी मला ‘रडू नको’, असे सांगितले आणि मला प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र दिले. मी ते छायाचित्र माझ्या हृदयाशी धरले. नंतर मी त्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मला प्रसुतीच्या वेदना चालू झाल्या.
१ आ. प.पू. भक्तराज महाराजांच्या कृपेमुळे प्रसुती नैसर्गिक होऊन आई आणि बाळ दोघेही सुखरूप असणे : ९ – १० घंट्यांनी माझी प्रसुती नैसर्गिक झाली. त्या वेळी बाळाचे वजन ३.७ कि.ग्रॅ. इतके होते. बाळाचे इतके वजन असूनही माझी नैसर्गिकरित्या (नॉर्मल) प्रसुती झालेली पाहून आधुनिक वैद्य आश्चर्यचकित झाले. केवळ प.पू. भक्तराज महाराजांच्या कृपेमुळे मी आणि बाळ दोघेही सुखरूप राहिलो. तेव्हापासून मी माझ्या व्यष्टी साधनेला आरंभ केला. कोणत्याही सेवेला मनापासून जाऊ लागले आणि माझ्या समष्टी साधनेलासुद्धा प्रारंभ झाला.
२. जन्मापासून ते ३ वर्षे
२ अ. शांत स्वभाव : चि. सर्वेश कधी रात्रीच्या वेळी रडत असला, तर त्याचे बाबा ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा नामजप करायचे. तेव्हा तो शांत झोपी जायचा. तो लहानपणापासून शांत आहे.
२ आ. चि. सर्वेश ९ मासांचा असल्यापासून स्वतःच्या हाताने जेवतो.
२ इ. आवड-नावड नसणे : खाण्याविषयी त्याची काही आवड-नावड नाही.
२ ई. सात्त्विकतेची आवड : त्याला सात्त्विक पोशाख परिधान करायला आवडतो.
२ उ. प्रेमभाव : त्याच्यामध्ये प्रेमभाव आहे. तो सर्वांमध्ये मिळून-मिसळून रहातो. सर्वेश दीड वर्षाचा असल्यापासून त्याला काही खाऊ दिला, तर तो सर्वांना देऊन मग खातो.
२ ऊ. आई सेवेला आश्रमामध्ये रहाण्यास गेल्यावर घरी शांत रहाणे : मी मंगळुरू येथे पाच दिवस सेवेसाठी गेले होते, तसेच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये अधिवेशन सेवेसाठी १५ दिवस गेले होते. त्या दोन्ही वेळी तो मला सोडून सर्वांसमवेत राहिला होता. त्याने एकही दिवस माझी आठवण काढली नाही.
२ ए. देवतांप्रतीचा भाव : सर्वेश ९ – १० मासांचा असतांना ‘श्रीराम जय राम’, असे म्हटल्यावर टाळ्या वाजवत असे. तो १ वर्षाचा असल्यापासून देवाला साष्टांग नमस्कार करतो. आता तो ‘हरे कृष्ण हरे राम’ आणि ‘गुरुदेव दत्त’, असे दिवसातून १ – २ वेळा म्हणतो.
२ ऐ. ऑनलाईन कार्यक्रमांना शांत रहाणे : ‘ऑनलाईन’ सत्संग, गुरुपौर्णिमा, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव या कार्यक्रमांना तो घरी शांत राहिला होता. गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त काढलेल्या नामदिंडीचा कार्यक्रम त्याने अडीच घंटे शांतपणे पाहिला.
धर्मप्रेमी सौ. प्रियांका लक्ष्मण घुमटे आणि साधिका कु. कल्पना जोतिबा मेलगे यांनी ‘चि. सर्वेशमध्ये बाळकृष्णाचे रूप दिसते’, असे सांगितले. सौ. घुमटेकाकू सर्वेशला ‘श्रीकृष्ण’, अशी हाक मारतात.
२ ओ. सर्वेश जन्माला आल्यापासून आमच्या घरात शांत आणि आनंदी वातावरण आहे.
२ औ. स्वभावदोष : हट्टीपणा.’
– सौ. रूपाली कुंभार (चि. सर्वेशची आई), बसुर्ते, बेळगाव. (५.६.२०२२)