दासबोधातील सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

गुरुस्तवन पुष्पांजली

गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

४. परीसस्‍पर्शाची मर्यादा आणि अमर्याद असलेली सद़्‍गुरुकृपा !

‘परीस आपणा ऐसें करीना ।
सुवर्णें लोहो पालटेना ।
उपदेश करी बहुत जना ।
अंकित सद़्‍गुरूचा ॥

शिष्‍यास गुरुत्‍व प्राप्‍त होये ।
सुवर्णें सुवर्ण करितां न ये ।
म्‍हणौनी उपमा न साहे ।
सद़्‍गुरुसी परिसाची ॥ – दासबोध, दशक १, समास ४, ओवी १५ आणि १६

अर्थ : परीस लोखंडाचे सोने करतो; पण त्‍या सुवर्णास तो आपले परीसत्‍व देत नाही, म्‍हणजे त्‍या सोन्‍याच्‍या स्‍पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही; पण जो साधक सद़्‍गुरूंचा कृपांकित होतो, तो अनेक लोकांचा उद्धार करू शकतो. परिसामुळे सुवर्ण झालेल्‍या सुवर्णाच्‍या स्‍पर्शाने दुसर्‍या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही; पण सद़्‍गुरुकृपेने शिष्‍यास मात्र गुरुत्‍वच प्राप्‍त होते. त्‍यामुळे सद़्‍गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्‍य नाही.’

४ अ. अल्‍प कालावधीत आपल्‍या शेकडो शिष्‍यांस गुरुत्‍व प्राप्‍त करून देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गेल्‍या अनेक वर्षांपासून अथक प्रयत्नांद्वारे अध्‍यात्‍म आणि धर्म कार्य केले आहे. सहस्रो साधकांची आध्‍यात्मिक उन्‍नती करून घेऊन शेकडो साधकांना गुरुत्‍व, म्‍हणजे संतत्‍व प्रदान केले आहे. त्‍यांच्‍या समष्‍टी कार्याची धुरा आता त्‍यांच्‍याद्वारे कृपांकित झालेले संत आणि सद़्‍गुरु सांभाळत आहेत. संत आणि सद़्‍गुरु यांच्‍या मार्गदर्शनानुसार सनातनचे साधकही झोकून देऊन समष्‍टी सेवा करत आहेत. हे साधक सच्‍चिदानंद गुरुदेवांचे जणू दूत बनून समाजात जातात आणि समाजाला अध्‍यात्‍म अन् धर्मकार्य अवगत करतात. साधकांचे वागणे-बोलणे आणि त्‍यांचे आचरण पाहून अपरिचित व्‍यक्‍तींनाही त्‍यांच्‍यामध्‍ये गुरुदेवांच्‍या आदर्शत्‍वाची छबी दिसते. महान गुरूंचे साधक म्‍हणून समाजातील काही जण साधकांना कृतज्ञतेने नमन करतात. हे सर्व गुरुमाहात्‍म्‍यच आहे !

साधकांनो, ‘अवतारी गुरूंचे कार्य संपूर्ण जगताला अवगत करण्‍यासाठी साक्षात् गुरुतत्त्वच आपल्‍या माध्‍यमातून कार्यरत होत असल्‍याने हे सर्व घडत आहे’, याची जाणीव ठेवा ! ‘स्‍व’चा आणि कर्तेपणाचा त्‍याग करून या गुरुलीलेचा आनंद अनुभवा !’

(क्रमश:)

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२७.६.२०२३)