आमच्‍या देवतांना शिव्‍या घालून खिल्ली उडवणारे शिवसेनेचा चेहरा कसा होऊ शकतात ? – प्रा. मनीषा कायंदे, आमदार

प्रा. मनीषा कायंदे यांचा शिवसेनेत प्रवेश !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करताना प्रा. मनीषा कायंदे आणि व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवर

मुंबई – आमच्‍या देवी-देवतांना ज्‍यांनी शिव्‍या घातल्‍या, त्‍यांची खिल्ली उडवली, ते लोक शिवसेनेचा चेहरा कसा काय होऊ शकतात? हा प्रश्‍न मला सतावत होता. काँग्रेसमधून काही जण येतात आणि मग ते आम्‍हालाच काहीतरी शिकवतात. ते सहन होत नव्‍हते. मी वयाच्‍या २५ व्‍या वर्षापासून शिवसेनेची मतदार आहे. पूर्वी भाजपात असले, तरी विचारांनी शिवसैनिक आहे. नुसते सकाळी उठून एकमेकांवर टीका-टीपणी करायची, त्‍यापेक्षा सकारात्‍मक काम करायची माझी इच्‍छा होती, असे प्रतिपादन विधान परिषदेच्‍या आमदार आणि ठाकरे गटाच्‍या माजी प्रवक्‍त्‍या प्रा. मनीषा कायंदे यांनी येथे केले. त्‍यांनी १८ जून या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला. रात्री विलंबाने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्‍थान असलेल्‍या ‘वर्षा’ बंगल्‍यावर त्‍यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

शिवसेनेच्‍या प्रवक्‍त्‍या प्रा. मनीषा कायंदे यांची हकालपट्टी !

मुंबई, १९ जून (वार्ता.) – ठाकरे गटाच्‍या शिवसेनेच्‍या प्रवक्‍त्‍या प्रा. मनीषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्‍यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या आदेशाने त्‍यांची शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्‍ते पदावरून हकालपट्टी करण्‍यात आली आहे, अशी माहिती शिवसेना (ठाकरे गट) मध्‍यवर्ती कार्यालयातून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्‍यात आली आहे.