(म्हणे), ‘मुंब्रा येथील धर्मांतराचे आरोप सिद्ध करा, अन्यथा क्षमा मागा !’ – राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधिकार्‍यांना पाठवली नोटीस !

सय्यद अली अश्रफ उपाख्य भाईसाहब

मुंबई – भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे उघडकीस आला. या प्रकरणाचे धागेदोरे मुंब्रा येथील प्रकरणाशी जोडले जात आहे. मुंब्रा येथे ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मुंब्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘मुंब्रा येथे ४०० सोडा, धर्मांतर झालेली ४ नावे तरी दाखवा’, असे आव्हान उत्तरप्रदेश पोलिसांना दिले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तप्रदेशातील प्रदेश सहसचिव तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी सदस्य सय्यद अली अश्रफ उपाख्य भाईसाहब यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पोलीस आयुक्त आणि गाझियाबादचे उपआयुक्त निपुण अग्रवाल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी गाझियाबाद येथील पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी दावा केला होता की, मुंब्रा येथे ‘ऑनलाईन गेम’द्वारे ४०० लोकांचे धर्मांतर करण्यात आले आहे. वृत्तवाहिन्यांवर चुकीची माहिती देऊन जाणीवपूर्वक अपर्कीती करणार्‍या निपुण अग्रवाल यांनी धर्मांतराचे आरोप सिद्ध करावेत, अन्यथा मुंब्रा येथील नागरिकांची क्षमा मागावी.

गाझियाबाद पोलीस विभागातील पोलीस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी एक निवेदन प्रसारित केले होते की, भ्रमणभाष करणार्‍या एका व्यक्तीने त्यांना गाझियाबादप्रमाणेच मुंब्रा येथे ३०० ते ४०० लोक धर्मांतरित झाल्याची माहिती दिली होती. तिने धर्मांतराशी संबंधित काही छायाचित्रे, व्हिडिओ, ऑडिओ आणि भ्रमणभाष क्रमांक पोलिसांना दिले आहेत. या माहितीची सत्यता पडताळली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंब्रा पोलीस पुरावे गोळा करण्यासाठी गाझियाबाद येथे पोचले आहेत.