‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा जयघोष केल्‍यावर त्‍यातील चैतन्‍याचे सामर्थ्‍य अनुभवणार्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५४ वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा नामजप केल्‍यावर दाही दिशांनी चैतन्‍याचे वेगवेगळ्‍या प्रकारचे अनेक लहान – मोठे सप्‍तरंगी गोळे पुष्‍कळ गतीने आकृष्‍ट होतांना दिसणे

पू. (सौ.) संगीता जाधव

‘मी जेवढ्या वेळा ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) असा जयघोष करते किंवा मनातल्‍या मनात जेवढ्या वेळा या नामजपाचा उच्‍चार होतो, त्‍या त्‍या क्षणाला दाही दिशांनी चैतन्‍याचे अनेक मोठे गोळे माझ्‍या दिशेने पुष्‍कळ गतीने आकृष्‍ट होतांना दिसतात. चैतन्‍याचे पिवळे, पांढरे आणि निळे असे वेगवेगळ्‍या प्रकारचे सप्‍तरंगी गोळे असतात. त्‍यांचा आकार वेगवेगळा असतो. काही मोठे असतात, तर काही लहान असतात.

२. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असे केवळ उच्‍चारले, तरी सगळ्‍या देवता त्‍या ठिकाणी आणि त्‍याच क्षणी आकृष्‍ट होणे अन् एवढे सामर्थ्‍य ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या स्‍मरणात आहे’, असे देवाने सांगणे

जेव्‍हा मी ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा उच्‍चार करते, त्‍या वेळी चैतन्‍याचे विविध प्रकारचे गोळे दाही दिशांनी वेगाने आणि सातत्‍याने येत रहातात. तसेच हे चैतन्‍याचे गोळे संपूर्ण वातावरणात अखंड पसरत असतांना माझ्‍या शरिरामध्‍ये सामावत असल्‍याचे मी अनुभवते. मग मी देवाला प्रश्‍न विचारला, ‘हे काय आहे ?’, तर त्‍याने सांगितले, ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ हे केवळ उच्‍चारले, तरी सगळ्‍या देवता त्‍या ठिकाणी आणि त्‍याच क्षणी आकृष्‍ट होतात. एवढे सामर्थ्‍य सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या स्‍मरणात आहे. अन्‍य देवतेचा नामजप करतांना आतापर्यंत मी असे कधीच अनुभवले नव्‍हते.

३. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यामध्‍ये विश्‍वातील सर्व देवता सामावलेल्‍या असल्‍याने त्‍यांचे स्‍मरण करताक्षणी सर्व देवतांचे तत्त्व आकृष्‍ट होत असावे !

वरील सूत्र ऐकून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. मला कळण्‍यासाठी देवाने असे दाखवले. गेल्‍या १ मासापासून मी जेवढ्या वेळा ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असे उच्‍चारते, तेव्‍हा प्रत्‍येक वेळी मी वरीलप्रमाणे ही दिव्‍य अनुभूती घेत आहे. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ या स्‍मरणामध्‍ये केवढे सामर्थ्‍य आहे, म्‍हणजे विश्‍वामध्‍ये जेवढ्या देवता आहेत, त्‍या सर्व देवता ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ यांच्‍यामध्‍ये सामावलेल्‍या आहेत, त्‍यामुळे स्‍मरण करताक्षणीच एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व देवतांचे तत्त्व आकृष्‍ट होत असावे.

४. देवता मोठ्या परिसरामध्‍ये वायूमंडलाची शुद्धी करत असणे आणि त्‍या शरिरात सामावल्‍यावर प्रत्‍येक पेशी अन् नाडी यांमध्‍ये कार्य करत असल्‍याचे भगवंताने सांगणे

नंतर मी भगवंताला एक प्रश्‍न विचारला.

मी (पू. (सौ.) संगीता जाधव) : देवता वायूमंडलामध्‍ये सर्वत्र कार्य कसे करतात ?

भगवंत : ज्‍या देवता येतात, त्‍या पुष्‍कळ मोठ्या परिसरामध्‍ये वायूमंडलाची शुद्धी करतात.

मी : देवता जेव्‍हा माझ्‍यामध्‍ये सामावल्‍या जातात, तेव्‍हा शरिरामध्‍ये काय प्रक्रिया घडते ?

भगवंत : सर्व देवता प्रत्‍येक पेशी आणि नाडी यांमध्‍ये कार्य करतात.

‘त्‍या क्षणाला माझ्‍या प्रत्‍येक पेशीची शुद्धी होत आहे’, असे मी प्रत्‍यक्ष अनुभवत होते.

५. ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ यांच्‍या स्‍मरणाने मला शक्‍ती मिळत होती. त्‍या वेळी मला प्रकाश जाणवत असून तो शरिरात गेल्‍यावर आतून काहीतरी निघून जात आहे अन् ‘माझ्‍या देहावर परिणाम होत आहे’, हे मी अनुभवते.’

(पू.) सौ. संगीता जाधव, ठाणे सेवाकेंद्र, जिल्‍हा ठाणे. (६.६.२०२३)


सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या यज्ञविधीच्‍या वेळी सनातनच्‍या तिन्‍ही गुरूंना देवतारूपात अनुभवणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या आज्ञाचक्रातून दिव्‍य प्रकाश मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यज्ञस्‍थळी आल्‍या, तेव्‍हा त्‍या दोघींच्‍या आज्ञाचक्रातून दिव्‍य प्रकाश मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होत होता. सूर्याच्‍या किरणांसारखा किंवा एखादा ‘हॅलोजन’चा दिवा लावल्‍यावर सर्वत्र प्रकाश पसरतो, तसा दिव्‍य प्रकाश त्‍यांच्‍या आज्ञाचक्रातून सर्वत्र पसरतांना मला दिसत होता.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ श्री लक्ष्मीदेवीच्‍या रूपात कमळात विराजमान असून त्‍यांच्‍या मागे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमीच्‍या पांढर्‍या पोशाखात दिसणे

थोड्या वेळाने मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यज्ञस्‍थळी जिथे बसल्‍या होत्‍या, त्‍या जागी दोन मोठी सुंदर कमळे दिसली. ‘त्‍या कमळांमध्‍ये श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ दोघीही श्री लक्ष्मीदेवीच्‍या रूपात विराजमान झाल्‍या आहेत’, असे जाणवले. त्‍या दोघींचे चेहरेे ओळखू येत होते; पण त्‍यांच्‍या तोंडवळ्‍यावर श्री लक्ष्मीदेवीचे दिव्‍य तेज जाणवत होते. नंतर अकस्‍मात् मला त्‍यांच्‍या मागून आकाशात एक जिना दिसला आणि त्‍यावरून नेहमीच्‍या पांढर्‍या शुभ्र पोशाखात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सावकाश पायर्‍या उतरून येतांना दिसले.

३. ‘यज्ञविधीच्‍या थेट प्रक्षेपणाच्‍या माध्‍यमातून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ सर्व साधकांच्‍या घरी पोचल्‍या असून तिथे त्‍या यज्ञविधी करतांना दिसणे, त्‍या दैवी असल्‍यामुळे सर्वत्र असू शकत आहेत’, असे जाणवून भाव जागृत होणे

सर्वत्रचे साधक थेट प्रक्षेपणाच्‍या माध्‍यमातून यज्ञविधी अनुभवत होते. ‘त्‍या सर्व साधकांच्‍या घरी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ दोघीही उपस्‍थित असून त्‍या साधकांच्‍या घरी यज्ञविधी चालू आहे आणि त्‍या यज्ञाचा प्रकाश सर्वत्र पसरला आहे. या दोघीही दैवी असल्‍यामुळेच त्‍या सर्वत्र असू शकतात’, असे मला जाणवले. ‘अवतारी गुरु काय करू शकतात ?,’ हे पाहून माझा भाव जागृत झाला आणि मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.’

– पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत), ठाणे सेवाकेंद्र (१६.५.२०२३)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार संतांच्या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक