सिंधुदुर्ग : पहिल्याच पावसात मडुरा येथील शाळेचे छप्पर कोसळले

  • शाळा बंद असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

  • २ वर्षांपूर्वी दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

मडुरा येथील शाळेचे कोसळलेले छप्पर

सावंतवाडी – पावसाळा अद्याप पूर्णपणे चालू झाला नसतांनाच तालुक्यातील बाबरवाडी, मडुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ चे छप्पर ११ जूनच्या रात्री कोसळले. सुदैवाने सध्या शाळा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

बाबरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ च्या इमारतीचा दुरुस्तीचा प्रस्ताव २ वर्षांपूर्वी प्रशासनास सादर करण्यात आला होता. शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत आणि शिक्षण विभाग यांचे याकडे लक्ष वेधले होते; मात्र विविध कारणे सांगत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याकडे कुणीही गांभीर्यपूर्वक लक्ष न दिल्याने पावसात शाळेचे छप्पर कोसळले. यात २ लाखांहून अधिक रुपयांची हानी झाल्याचे ग्रामस्थ आणि पालक यांनी सांगितले.

शाळेच्या दु:स्थितीची प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देण्यात आली. शाळेत विद्यार्थी असते, तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे जोपर्यंत शाळेची योग्य पद्धतीने दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केल्याचे मडुराचे माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांच्या जिवाचीही काळजी नसलेल्या आणि त्यामुळे दुरुस्तीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर कडक कारवाई व्हायला हवी !