पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन !

रत्नागिरी – बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळलेला असून १६ जूनपर्यंत ही स्थिती रहाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  गणपतीपुळेसह रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी, आरे-वारे, नेवरे या किनार्‍यांवर खवळलेल्या समुद्रात उंचचउंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बिपरजॉय वादळाचा परिणाम येथील किनार्‍यावर जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

गणपतीपुळे येथील हानी

११ जून या दिवशी भरतीच्या वेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत गणपतीपुळे येथील गणपति मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत पाणी पोचले होते. याच किनार्‍यावर असणारे पर्यटक पाण्याबरोबर ढकलले गेले होते, तर काही पर्यटकांचे साहित्य वाहून समुद्रात गेले होते, तसेच किनार्‍यावरील व्यापार्‍यांच्या दुकानात पाणी घुसल्याने ४९ व्यापार्‍यांची हानी झाली आहे.

व्यावसायिकांना हानीभरपाई देणार ! – पालकमंत्री उदय सामंत  

उदय सामंत

पालकमंत्री उदय सामंत यांनी १२ जून या दिवशी गणपतीपुळे येथे भेट दिली आणि तेथील दुकानांची पहाणी करून व्यापार्‍यांशी चर्चाही केली. ४९ व्यापार्‍यांची जी हानी झाले त्यांना हानीभरपाई देण्याचे पालकमंत्री सामंत यांनी घोषित केले. या वेळी सरपंच कल्पना पकीये, डॉ. विवेक भिडे, अमित घनवटकर, मुख्य पुजारी उमेश घनवटकर, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.