सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
वैशाख कृष्ण सप्तमीच्या शुभतिथीला (११.५.२०२३ या दिवशी) फर्मागुडी, गोवा येथील मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव भावपूर्णरित्या साजरा झाला. या वेळी रथारूढ श्रीविष्णुरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांना दर्शन दिले. या वेळी कार्यक्रमस्थळाचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत. ४ जून या दिवशी आपण कार्यक्रमाच्या स्थानी प्रवेशासाठी असलेली चार द्वारे याविषयी भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या, म्हणजेच ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची वैशिष्ट्यपूर्ण रचना, त्यामागील शास्त्र आणि ८१ व्या जन्मोत्सवाचे (काळाचे) संख्याशास्त्रानुसार महत्त्व !
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/688549.html |
१. ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची आध्यात्मिक रचना होण्यामागील शास्त्र
१ ई. कार्यक्रमस्थळी असलेल्या चार द्वारांतून भाव, चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होणे : ‘मुख्य कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ४ द्वारांत शक्ती ५ टक्के, भाव ३० टक्के, चैतन्य ३० टक्के, आनंद २५ टक्के आणि शांती १० टक्के या प्रमाणात कार्यरत होती. त्यामुळे या ४ द्वारांतून वायूमंडलात भाव, चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होऊन वातावरण अधिक सात्त्विक झाले होते.’
१ उ. ‘कार्यक्रमस्थळी असलेल्या चार द्वारांमध्ये वैकुंठ द्वारासारखी आध्यात्मिक क्षमता आहे’, असे जाणवणे : कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यासाठी उभ्या केलेल्या ४ द्वारांपैकी एका द्वारातून मी आत प्रवेश केला. द्वारातून प्रवेश करताच ‘मी एका वेगळ्याच ठिकाणी प्रवेश केला आहे’, असे मला जाणवले. द्वाराबाहेरील वायूमंडलाची स्पंदने वेगळी होती आणि द्वाराच्या आतील, म्हणजे कार्यक्रमस्थळी वायूमंडलाची स्पंदने वेगळी होती. केवळ द्वारातून आत प्रवेश केल्यावर माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण २० ते ३० टक्के न्यून झाले आणि ‘३० ते ४० टक्के अधिक प्रमाणात चैतन्य ग्रहण होत आहे’, असे मला जाणवले. ‘पंढरपूरला भीमा नदीत स्नान करून भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, त्याप्रमाणे कार्यक्रम स्थळी असलेल्या द्वारातून आत जातांना चैतन्यगंगेत स्नान करून मी श्रीविष्णूच्या वैकुंठात प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले. वैकुंठात श्रीविष्णूचे दर्शन घेण्यासाठी जातांना सूक्ष्मातून सप्तद्वारे असतात. कार्यक्रमासाठी फर्मागुडीच्या मुख्य चौकापासून कार्यक्रमाच्या स्थानी प्रवेश करीपर्यंत एकूण ७ कमानी उभ्या केल्या होत्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी असलेल्या प्रवेशद्वारातून आत जातांना काही साधकांना ‘वैकुंठाची सप्तद्वारे ओलांडत आहोत’, अशी अनुभूती आली. ‘श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दर्शनासाठीही ईश्वराने वर्तमानयुगाच्या अनुषंगाने वैकुंठद्वारासारखी अनुभूती देण्याची आध्यात्मिक क्षमता असलेली द्वारे उभी केली आहेत’, असे मला जाणवले.
१ ऊ. कार्यक्रमाच्या स्थळाविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१ ऊ १. कार्यक्रमाच्या स्थळाची रचना : कार्यक्रमस्थळाची रचना आयताकृती केली होती. त्यात चारही बाजूंनी साधकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आश्रमातील साधकांच्या बैठक व्यवस्थेजवळ रथ झाकून ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे चारही बाजूंनी कार्यक्रमाची जागा बंदिस्त करून केवळ ४ द्वारातून मुख्य कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळाचा मध्य भाग, म्हणजे प्रांगण रिकामे ठेवून मध्यभागी व्यासपीठ उभे केले होते.
१ ऊ २. ‘कार्यक्रमस्थळाच्या प्रांगणातील मोकळा भाग, म्हणजे क्षीरसागर असून व्यासपीठ, म्हणजे शेषनाग आहे’, असे ईश्वराने सांगणे : कार्यक्रमस्थळाच्या प्रांगणातील मोकळ्या भागाकडे बघितल्यावर मला तिथे आपतत्त्व आणि सूक्ष्मातून निळसर रंग दिसला. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘वैकुंठात क्षीरसागर आहे. त्या क्षीरसागरात शेषनागावर लक्ष्मीपती श्रीविष्णु योगनिद्रेत असतो. श्रीविष्णूला भेटायला येणार्या किंवा मनोगत व्यक्त करणार्या देवता किंवा ऋषिमुनी शेषनागाच्या एका भागावर उभे राहून आपले मनोगत कथन करतात. श्रीविष्णुरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दर्शनासाठी जमलेल्या समष्टीच्या भावामुळे कार्यक्रमस्थळाच्या पोकळ (मोकळ्या) जागी सूक्ष्मातून क्षीरसागर (भावाचे प्रतीक असलेले आपतत्त्व) प्रकटला असून मंच म्हणजे शेषनागाचे स्थान आहे.’
देवाने भूमी आणि आकाश यांचे अद्वैत दाखवलेल्या ठिकाणी श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा होणे‘मला कार्यक्रमस्थळाच्या मोकळ्या जागेविषयी जाणवलेले क्षीरसागराचे सूत्र अनौपचारिक चर्चेत मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘कार्यक्रमाच्या स्थळातील मोकळी जागा, म्हणजे इथे सूक्ष्मातून निळा क्षीरसागर आणि वर निळसर मुक्त आकाश ! यातून देवाने भूमी आणि आकाश यांचे अद्वैत दाखवले. अशा स्थानी श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा झाला’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’’ – श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१३.५.२०२३) |
१ ऊ ३. सद्गुरु, संत, भक्त आणि साधक यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम स्थळाचे वायूमंडल कुंभमेळ्यासारखे चैतन्यमय होणे : कार्यक्रमस्थळी जसजशी सद्गुरु, संत, भक्त आणि साधक यांच्या संख्येत वाढ होत होती, तसतसे कार्यक्रमस्थळातील चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्पंदनांच्या प्रमाणात वाढ होत गेली. कार्यक्रमस्थळाचे पूर्ण वातावरण पुष्कळ चैतन्यमय झाले होते. तेव्हा मला सूक्ष्मातून जाणवले, ‘सद्गुरु, संत, भक्त आणि साधक यांच्या समष्टी एकत्रीकरणामुळे कार्यक्रमस्थळाचे वायूमंडल कुंभमेळ्यासारखे झाले आहे. ‘ज्याप्रमाणे समष्टी भावामुळे कुंभाच्या ठिकाणी ईश्वरी शक्ती प्रगट होऊन सर्वांना चैतन्याचा कृपाशीर्वाद देते, त्याप्रमाणे साधना करणार्या समष्टीमुळे कार्यक्रमस्थळही साधारण स्थान न रहाता चैतन्य, आनंद आणि शांती यांनी युक्त दिव्य, अलौकिक अन् अनुभूती देणारे झाले आहे.’
२. संख्याशास्त्रानुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाची स्पंदन संख्या ९ असणे आणि तिचे महत्त्व !
२ अ १. नऊ ही संख्या परिपूर्णतेचे प्रतीक असणे, त्यामुळे श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या परिपूर्ण रूपाचे दर्शन होणार असणे : वर्ष २०१५ पासून, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ७३ व्या वाढदिवसापासून महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्मोत्सव साजरे केले जात आहे. ७३ व्या वर्षापासून ८० व्या वर्षापर्यंत प्रत्येक वर्षांच्या अंकाची बेरीज, उदा. ७३ = ७+३= १०, म्हणजे १+०= १. ही संख्या ९ पेक्षा अल्प येते. ९ हा अंक पूर्णत्वाचे प्रतीक आहे. यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव सोहळ्यात समष्टीला त्यांच्या परिपूर्ण रूपाचे दर्शन होईल. प्रत्यक्षातही या सोहळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गुण असलेल्या विविध साधकांचे परिचय करून देणे, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या व्यष्टी सगुण रूपासह त्यांच्या कार्यरूपाचे (म्हणजे समष्टी निर्गुण रूपाचे) दर्शनही समष्टीला करून दिले.
२ अ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाची ९ ही स्पंदनसंख्या हा सोहळा परिपूर्ण आणि समष्टीला सगुणातून निर्गुणात नेणारी, म्हणजे ईश्वरी राज्य संस्थापनेच्या प्रक्रियेचे प्रतीक असणे : देवनागरी लिपीतील प्रत्येक अंकात शून्य असते; पण केवळ १ आणि ९ या अंकांमध्ये शून्य वरच्या टोकाला असते. १ या अंकात ० च्या उजव्या बाजूतून रेषा बाहेर निघून १ अंक बनतो. ही क्रिया निर्गुणातून सगुणात येण्याची प्रक्रिया दाखवते; याउलट देवनागरी लिपीत लिहिल्या जाणार्या ९ या अंकात ० च्या डाव्या बाजूतून रेषा बाहेर निघून
९ अंक बनतो. हा अंक सगुणातून निर्गुणात जाण्याची प्रक्रिया, म्हणजे धर्मसंस्थापनेची प्रक्रिया दर्शवतोे. भगवान श्रीरामाचा जन्म नवमीला झाला असून त्याने जनतेमध्ये सात्त्विकता निर्माण करून सहस्रो वर्षे टिकणारे रामराज्य स्थापित केले. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाची ९ ही स्पंदन संख्या समष्टीला सगुणातून निर्गुणात नेण्याचे, म्हणजे ईश्वरी राज्य संस्थापनेच्या प्रक्रियेचे प्रतीक आहे.
२ अ ३. महर्षींच्या आज्ञेने साजरा होणारा हा ९ वा जन्मोत्सव असून तो निर्गुणाच्याही पलीकडे असण्याचे प्रतीक असणे : वर्ष २०१५ पासून, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ७३ व्या वाढदिवसापासून महर्षींच्या आज्ञेने त्यांचे जन्मोत्सव साजरे केले जात आहे. वर्ष २०२३ मधील जन्मोत्सव हा महर्षींच्या आज्ञेने साजरा होणारा ९ वा जन्मोत्सव आहे. शून्य म्हणजे निर्गुण. देवनागरी लिपीतील ८ हा अंक सोडून प्रत्येक अंकात शून्य असतेच, म्हणजे हा अंक निर्गुणाच्याही पलीकडे आहे. वर्ष २०२२ मध्ये महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८ वा जन्मोत्सव साजरा झाला होता. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने असलेल्या रथोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले निर्गुणाच्याही पलीकडे गेले. ईश्वर निर्गुण आहे, तर परमेश्वर (परब्रह्म) निर्गुणाच्याही पलीकडे आहे. महर्षींच्या आज्ञेने साजर्या होणार्या ९ व्या जन्मोत्सवापासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे निर्गुणाच्या पलीकडील, म्हणजे परब्रह्म (परमेश्वर) स्तरावरील कार्य चालू होणार आहे.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ‘अपुनरावृत्ती’ योगात साजरा होणे
२ आ १. ‘अपुनरावृत्ती’ योगाची व्याख्या : हिंदु धर्मशास्त्रात काकभुशुण्डि नावाच्या एका तेजस्वी संतांचा उल्लेख आढळतो. श्रीरामाच्या आशीर्वादाने ते चिरंजीव आहेत. काकभुशुण्डि यांनी ११ वेळा रामायण आणि १६ वेळा महाभारत बघितले आहे. प्रत्येक वेळी रामायण आणि महाभारत अधिकांश वेळा एक सारखेच घडते, म्हणजे प्रत्येक कल्पात त्याची पुनरावृत्ती होते; पण काही प्रसंग असे असतात, ज्यात पालट होतात, म्हणजे ज्यांची पुनरावृत्ती होत नाही. अशा प्रसंगांना ‘अपुनरावृत्ती योग’ (जे कुठल्याही कल्पात पुन्हा कधीच घडत नाही)’ म्हणजे ‘दुर्लभातीदुर्लभ’, असा योग !
२ आ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव ‘अपुनरावृत्ती’ योगात घडणे : प्रत्येक कल्पात विधीलिखित घटनाक्रम अधिकतर एक सारखेच घडतात, म्हणजे प्रत्येक कल्पात त्या घटनांची पुनरावृत्ती होते; याउलट ज्या वेळी समष्टीची भक्ती न्यून पडून अनिष्ट शक्तींनी निर्माण केलेल्या त्रासदायक शक्तीचे आवरण किंवा मायेचे आवरण यांमुळे समष्टी काळानुसार आचरण करत नाही, अशा वेळी समष्टीचे योग्य आचरण होण्यासाठी अवतार काळानुसार वर्तमानकाळाला पूरक अशा काही कृती करतात, उदा. समष्टीला देवत्व लक्षात येण्यासाठी महर्षींनी सांगितल्यानुसार जन्मोत्सव साजरा केला. त्यामुळे दुर्लभ असा ‘अपुनरावृत्ती योग’ निर्माण झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाची स्पंदन संख्या आणि महर्षींच्या आज्ञेनुसार साजरा केल्या जाणार्या जन्मोत्सवाचा अंक ९ हाच येणे, हा दुर्लभ योग आहे. नऊ ही संख्या हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. हेही याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. यामुळे ‘अपुनरावृत्ती योग’ निर्माण होऊन ‘न भूतो न भविष्यति ।’, असा हा सोहळा झाला.
३. कृतज्ञता
वरील ज्ञानातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव जिथे साजरा झाला, ते स्थळही समष्टीच्या क्रियमाणामुळे दिव्य झाले असून ज्या काळात हा ब्रह्मोत्सव घडला, तो काळही ‘अपुनरावृत्ती योग’ म्हणजे ‘दुर्लभातीदुर्लभ’, असा होता’, असे लक्षात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ब्रह्मोेत्सवाच्या माध्यमातून आम्हा साधकांवर केलेल्या या कृपेसाठी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२३, सकाळी ९.१५ ते ११.०५ आणि दुपारी ४.१५ ते ६.५५ )
|