निरोगी जीवनासाठी आयुर्वेद !

आपले आरोग्य ‘आपण आपला दिवस कसा घालवतो’ यावर अवलंबून असते. आयुष्यातील प्रत्येक दिवस निरोगी झाल्यास सर्व आयुष्यच आरोग्यसंपन्न आणि आनंदी होते. म्हणूनच आरोग्यरक्षण हा संयमी जीवनाचा पाया आहे !

कधी उठावे ?

स्वस्थ व्यक्तींनी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी ४ घटिका किंवा ९६ मिनिटे उठावे. पहाटे मन ताजेतवाने असते, तसेच पहाटेचे वातावरणही शांत आणि उत्साही असते. त्यामुळे या वेळी अभ्यास, चिंतन, मनन, ध्यान किंवा देवाची प्रार्थना एकाग्रतेने करता येते. उठल्यावर सर्वप्रथम शांत चित्ताने देवाचे स्मरण करावे. त्यामुळे मन निर्विकार होऊन आपल्याला मानसिक बल प्राप्त होते. ऋषिमुनी ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी या वेळी ध्यानस्थ होत असत. म्हणूनच या मुहूर्तास ‘ब्राह्ममुहूर्त’, असे म्हणतात. ऋषिमुनी ध्यान करत असतांना निर्माण होणार्‍या सात्त्विक लहरी वातावरणांत पसरतात. त्यामुळे आपले मन प्रसन्न होऊन ध्यानात आपली लवकर प्रगती होते.


दातांची काळजी कशी घ्याल ?

१. झोपून उठल्यावर, तसेच सकाळ-संध्याकाळच्या जेवणानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर दात घासावेत (दातावरून बोट फिरवावे.) दात घासून झाल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे आवश्यक असते.

२. दंतमंजन – सुंठ, मिरे, पिंपळी, दालचिनी, वेलची, तमालपत्र, तेजवती, त्रिफळा, खदिर आणि सैंधव यांचे समभाग चूर्ण घेऊन ते तिळाच्या तेलात मिसळून दात घासण्यासाठी वापरावे.

३. ब्रश – रूई, वड, खदिर, करंज, अर्जुन किंवा कडुनिंब यांचे कोवळे देठ चावून त्याचा ब्रश तयार करावा. देठ चावल्यामुळे दात आणि हिरड्यांना व्यायाम होतो.

दात, हिरड्या आणि जीभ यांचे आरोग्य  !

त्रिफळाचूर्णाचे तिळाच्या तेलात मिश्रण तयार करून ते हिरड्यांवर चोळावे. फ्लोराइडचा लेप अधून-मधून दातांना लावल्यास दात किडणे टाळता येते. जीभ घासल्याने जीभेवरील मल दूर होतो आणि तोेंडाला येणारी दुर्गंधीही निघून जाते. विविध पदार्थांची चव चांगल्या प्रकारे समजते आणि तसेच तोंडातील जंतूंचे प्रमाण अल्प होते.

आयुर्वेदानुसार सौंदर्यनिगा ! : त्वचेसाठी पोषक द्रव्ये औषधे

१. च्यवनप्राश : २ ते ४ चमचे सकाळी घ्यावेत.

२. ब्राह्मी रस : १ औंस ब्राह्मी रस आणि ताजे शंखपुष्पी सिरप १ औंस हे मुख्यतः चटकन राग येणार्‍या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी घ्यावे. हे त्वचा आणि मेंदूला हितकर आहे.

३. बावचीच्या बिया आणि काळे तीळ यांचे मिश्रण : प्रतिदिन वरील मिश्रणाचा १ चमचा असे १ वर्ष घेतल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते, तसेच ज्यांना त्वचारोग आहे, त्यांनीही घ्यावे.

४. त्रिफळा : १/२ चमचा त्रिफळा चूर्ण आणि १ चमचा काळे तीळ घेतल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.

५. चित्रकमूळ चूर्ण : मध, तूप, दूध किंवा गोमूत्र यांच्यासह चित्रकमूळ चूर्ण घेतल्यास अपचनामुळे निर्माण होणारे त्वचारोग टाळता येतात.

६. तिक्त धृत : २ ते ४ चमचे रोज ३ मास पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी त्वचेच्या आरोग्यासाठी घ्यावा.

७. महामंजिष्ठादि काढा : २ ते ४ चमचे दिवसातून २ वेळा ३ मास घ्यावा.


त्वचेचा वर्ण आणि कांती सुधारण्यासाठी पुढील गोष्टी करा !

१. वात प्रकृतीच्या व्यक्ती : म्हणजेच ज्यांची त्वचा रुक्ष, खरबरीत आणि भेगा पडलेली आहे त्यांनी तिळाचे तेल बेहडा, कुष्ठ, खसखस, निर्गुडीची पाने, जटामांसी, जायफळ आणि रास्ना यांचा लेप लावणे हितावह असते.

२. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती : यांची त्वचा पातळ, उष्ण, पिवळसर लाल, दुर्गंधी येणारी आणि जास्तीत जास्त घाम येणारी असते. त्यांनी चंदन, कमळ, जेष्ठमध, मंजिष्ठा, अनंतमूळ आणि दूर्वा यांचा दूध लोणी किंवा तुपातून लेप लावणे चांगले असते.

३. कफ प्रकृतीच्या व्यक्ती  : यांची त्वचा मृदू, थंड, चिकट आणि तेलकट असते. त्यांनी लोध्र, देवदारू, कायफळ, कदम्ब, वेलची, अशोक, हिरडा, केशर यांचे चूर्ण त्वचेवर घासून लावावे.


केसांसाठी बलदायक औषधे  !

केस बळकट होण्यासाठी करायचे उपाय

१. वात प्रकृती : ज्येष्ठमध, निर्गुडी, कांदा, बावची, गुळवेल, लसूण, माका, जटामांसी आणि लोहभस्माचा उपयोग करावा.

२. पित्त प्रकृती : आवळा, नीळकमळ, केतकी, कदलीकंद, जास्वंद, ज्येष्ठमध, गुळवेल, खोबरेल तेल, कांदा, कोहळा, भोकर आणि लोहभस्म.

३. कफ प्रकृती : लोहभस्म, असाणा, बावची, बेहडा, गुळवेल, लसूण आणि माका.

त्या त्या प्रकृतीच्या लोकांनी वरील औषधांनी तिळाचे तेल सिद्ध करावे आणि केसांच्या वाढीसाठी ते डोक्याला लावावे. वरील औषधांचे चूर्ण किंवा काढा त्यांनी सिद्ध केलेले तूप पोटात घ्यावे. अकाली केस पांढरे होऊ नयेत म्हणून गोखरू, आवळा आणि गुळवेल चूर्ण १ ते २ चमचे सकाळी तूप अन् मधासह घ्यावे.


डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?

तिळाच्या तेलाचे स्नेहन !

१. तिळाच्या तेलाने अभ्यंग करून मर्दन (मसाज) करणे डोळ्यांसाठी हितावह असते.

२. डोक्याला तेल लावणे आणि कानात तेलाचे थेंब टाकणे : खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाचे थेंब प्रतिदिन कानांत घालणे आणि डोक्याला तेल लावणे डोळ्यांना हितकारक असते.

३. थंड पाण्याचे स्नान : डोळे नेहमी थंड पाण्याने धुवावेत. डोक्यावरून थंड पाण्याने स्नान करावे आणि मानेखाली कोमट पाण्याने स्नान करावे. डोक्यावरून गरम पाण्याने आंघोळ करू नये. बाहेरून आल्यावर थंड पाण्याने पाय धुवावेत.

४. सुगंध : चमेली, जुई, मोगरा, कमळ, तुळस आणि मेंदीचा सुगंध डोळ्यांना उपयोगी असतो.

५. ज्योतित्राटकामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

६. भ्रमणसंगणक वापरतांना मध्ये मध्ये डोळ्यांना विश्रांती द्यावी.

७. भ्रमणभाष अंधारात पहाणे आणि त्याचा अतीवापर टाळावा.

दृष्टी सुधारण्यासाठी औषध !

त्रिफळा चूर्ण मध आणि तुपासमवेत प्रतिदिन रात्री घेतल्यास डोळ्यांना हितकारक असते. त्रिफळाची मात्रा विरेचनाच्या मात्रेच्या १/४ किंवा १/२ असावी. मध आणि तूप समप्रमाणात घेऊ नये. कफप्रकृती असल्यास मध अधिक घ्यावा. पित्त आणि वातप्रकृती असल्यास तूप अधिक घ्यावे.

डोळ्यांची आग होण्यावरील उपाय !

१. त्रिफळा रात्री पाण्यात भिजवून त्या पाण्याने डोळे धुवावेत.

२. दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात.

३. गुळवेल, आवळा, नागरमोथा पोटात घ्यावे.

४. चंद्रकला रस ६० मिलीगॅ्रम ४ वेळा घ्यावे.

५. प्रभाळभस्म मिश्रित गुलकंद १ – १ चमचा २ वेळा घ्यावे.

६. मोरावळा १ – १ आवळा २ वेळा घ्यावे.


अंगाला तेल लावण्याचे अनन्यसाधारण लाभ !

सर्वांगाला अभ्यंग केल्याने होणारे लाभ

१. त्वचा मृदू, घट्ट आणि कणखर होऊन तिची कांती अन् तुकतुकी वाढते. तसेच रोमकुपापर्यंत रस पोचण्यासही साहाय्य होते.

२. त्वचेमध्ये असणार्‍या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू यांच्यामुळे स्पर्शज्ञान सुयोग्य रितीने होते अन् त्या उत्तेजित ठेवल्या जातात.

३. स्नायू बलवान होतात. त्यानंतर व्यायाम केल्याने शरीर शक्तीशाली आणि स्थिर होते.

४. ग्लानी, आळस आणि श्रम नाहीसे होतात.

५. सर्वांग, तसेच शरिराचे अवयव, धातू यांना बल मिळते.

६. रात्री तेलाने शरीर चोळले, मर्दन (मालिश) वा अभ्यंग केले असता शांत झोप लागते.

७. वात आणि कफ शमनाचे कार्य होते.

८. दृष्टी सुधारते.

९. वृद्धांचे आयुष्य वाढते आणि ते दीर्घायुषी होतात. वृद्धांनी व्यायाम करू नये. त्याऐवजी त्यांनी अभ्यंग करावा. तो त्यांना विशेष उपयुक्त आहे.

कानात तेल घालण्याचे लाभ !

१. कानात प्रतिदिन तेल घातल्याने बाहेरील कान आणि शब्दपथ शुष्क होणे, मान अन् जबडा यांच्यात ताठरपणा येणे, बहिरेपणा, कानात आवाज येणे हे रोग सहसा होत नाहीत. कानात कोणते तेल घालावे हे प्रकृतीवर अवलंबून असते. वात आणि कफ प्रकृतीच्या लोकांनी तीळतेल घालावे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने खोबरेल किंवा निर्गुडीचे तेल घालावे.

२. कान दुखणे, बहिरेपणा कानात मळ साठणे त्याचप्रमाणे कानाचे इतर वातविकार होत नाहीत.

३. डोकेदुखी, मान आणि जबडा जखडणे अन् हनुस्तंभ यांसारखे विकार बरे होतात.

४. तेलाचे थेंब कानामध्ये १०० मात्रा, म्हणजे ३२ सेकंदपर्यंत धारण करावे.

पायांना तेल चोळण्याचे (पादाभ्यंगाचे) लाभ

१. तळपायांना येणारा खरखरीतपणा, खडबडीतपणा, भेगा, तसेच शुष्कता नाहीशी होते.

२. पोटर्‍या आणि मांड्यांना पेटके येत नाहीत किंवा अतीश्रमानंतर येणारे पेटके कमी होतात.

३. पायांची संवेदनक्षमता वाढते.

४. पायांचे स्थैर्य, बल, कांती वाढते आणि त्वचा तुकतुकीत रहाते.

५. सायटिका, अर्धांगवायूसारख्या वातविकारांवर हितावह आहे.

६. दृष्टी सुधारते आणि शांत झोप लागते.

७. पायाची त्वचा, रोमकूप, वाहिन्या, तसेच मज्जातंतू यांचे बल वाढते.

डोक्यास तेल लावण्याचे लाभ (शिरोभ्यंगाचे लाभ)

१. ज्ञानतंतूचे बल, इच्छावर्ती स्नायू आणि अवयवांची शक्ती वाढते.

२. दृष्टी सुधारते. गाल आणि डोळे यांस बलप्राप्ती होते.

३. शिरोरोग, तसेच मज्जारोगांवर उपयुक्त आहे.

४. डोक्यावरील केसांची वाढ चांगली होऊन ते लांबसडक, काळेभोर, स्पर्शास मृदू आणि बळकट होतात.

५. चेहर्‍याची कांती तजेलदार होते. सुरकुत्या नाहीशा होऊन त्वचारोग आणि तारुण्यपिटीका उद्भवत नाहीत.

६. अकाली केस पिकणे आणि टक्कल पडणे यांस आळा घातला जातो.

७. डोकेदुखी होत नाही.

८. झोप चांगली लागते.

९. डोक्यामध्ये खवडा आणि खाज सुटत नाही.

तेल सिंचनामुळे होणारे लाभ

१. श्रम तसेच थकवा न्यून होतो.

२. हृदयाचे प्रसादन (स्वच्छता) होते.

३. वातविकारांमध्ये उपयुक्त आहे.

(संदर्भ – सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून व्यायामापर्यंतच्या कृती’)


नाकात औषध घालणे (नस्य)

नाकात २-२ थेंब तेल वा तूप घालणे याला ‘नस्य’ असे म्हणतात.

लाभ : नस्य केल्याने मेंदूला शक्ती मिळते. डोकेदुखी, खांदेदुखी, केस गळणे किंवा पांढरे होणे, दोन नाकपुड्यांमधील पडदा (Nasal septum) एका कडेला सरकणे, दमा, जुनाट सर्दी, जुनाट खोकला यांसारख्या विकारांमध्ये, तसेच मानेच्या वरच्या भागाच्या आरोग्यासाठी प्रतिदिन नस्य करणे लाभदायक आहे.

– वैद्य मेघराज पराडकर, आयुर्वेदाचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.