बस्‍ती चिकित्‍सा !

पावसाळ्‍यात वातदोष वाढू नये म्‍हणून काय कराल ?

ग्रीवा बस्‍ती

पावसाळ्‍यात वाताचे जुने दुखणे हळूहळू डोके वर काढते. हवामानातील रुक्षता वाढल्‍याने वाताचे प्राबल्‍य वाढते. अशा परिस्‍थितीत शरिरामध्‍येही वातदोष वाढायला लागतो. पावसाळ्‍यात वातदोष आणि त्‍यामुळे निर्माण होणारे विविध रोग वाढू नयेत म्‍हणून आपण पुढील गोष्‍टी करू शकतो –

१. अभ्‍यंग : प्रतिदिन अंगाला तेल लावून मसाज करून अंघोळ करावी. त्‍यामुळे शरिरात वाढणार्‍या वातदोषाला अटकाव होतो.

२. कोष्‍ण जल : प्रतिदिन कोमट पाणी प्‍यावे. शक्‍यतो बाहेरील पाणी पिऊ नये; कारण वर्षा ऋतूमध्‍ये पाण्‍यात आम्‍लता आलेली असते. आम्‍लतेच्‍या गुणधर्मामुळे ते पाणी पचण्‍यास हलके नसल्‍याने पाणी गरम करूनच प्‍यावे.

३. सकस आहार : बाहेरील चमचमीत पदार्थांचे जेवण टाळावे. यामुळे पचनाच्‍या वेगवेगळ्‍या तक्रारींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. प्रतिदिन रात्री शक्‍य तितक्‍या हलक्‍या आहाराचे सेवन करावे.

४. व्‍यायाम : सूर्यनमस्‍कार, कवायत, चालणे, प्राणायाम, योग इत्‍यादी सहज, सोपे व्‍यायाम वेळ काढून करावेत.

५. पंचकर्म : स्‍वस्‍थ रहाण्‍यासाठी आयुर्वेदातील पंचकर्म किंवा बस्‍ती चिकित्‍सा करून घ्‍यावी. आयुर्वेदामध्‍ये असे म्‍हणतात, ‘वर्षाऋतू चालू झाला की, बस्‍ती घ्‍यावी.’

बस्‍ती चिकित्‍सेचे महत्त्व !

कटी बस्‍ती

बस्‍तीला आयुर्वेदानुसार ‘अर्धचिकित्‍सा’ असे म्‍हटलेले आहे. वातादिक दोषांवर केवळ बस्‍ती हितकारक आहे. बस्‍ती सर्व प्रकारच्‍या चिकित्‍सांमध्‍ये श्रेष्‍ठ असून त्‍याचे निरूह, अनुवासन आणि उत्तर बस्‍ती असे ३ प्रकार आहेत.

सर्व पंचकर्म चिकित्‍सा एका बाजूला आणि त्‍यांतील फक्‍त बस्‍ती कर्म एका बाजूला इतके महत्त्व बस्‍ती या चिकित्‍सेला देण्‍यात आलेले आहे. बस्‍ती चिकित्‍सामुळे आपण वातावर जय मिळवतो. आपल्‍या शरिरात होणार्‍या सगळ्‍या हालचाली चलन-वलन हे वाताशी निगडित असते.

वातदोषामुळे इतर दोन दोषांचे कर्म बिघडू शकते. पित्त आणि कफ दोषांची कामेसुद्धा वातदोषावरच अवलंबून आहेत; म्‍हणून वातावरील श्रेष्‍ठ चिकित्‍सा बस्‍ती याला इतके प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

बस्‍ती म्‍हणजे काय ?

अभ्‍यंग आणि स्‍वेदनपूर्वक मलद्वारातून औषधी काढे आणि तेल देऊन दूषित दोषांना शरिराबाहेर काढून शरीरशुद्धी करणे म्‍हणजे बस्‍ती. आयुर्वेदानुसार स्‍वस्‍थ व्‍यक्‍तीसाठी आणि रोगी व्‍यक्‍तीसाठी असे दोन्‍ही प्रकारे पंचकर्म सांगितलेले आहे.

स्‍वस्‍थ व्‍यक्‍तींनी कुठल्‍या ऋतूत कोणते पंचकर्म करावे ? 

स्‍वस्‍थ व्‍यक्‍तींनी पंचकर्म करतांना ऋतूनुसार पंचकर्म करावे, असे सांगितलेले आहे. ज्‍या ऋतूमध्‍ये ज्‍या ज्‍या दोषाचा प्रकोप असेल, तो दोष निरहरण करण्‍यासाठी पंचकर्म करावे. जसे की, शरद ऋतूमध्‍ये पित्तासाठी विरेचन, रक्‍तमोक्षण; वर्षा ऋतूमध्‍ये मन्‍या बस्‍ती, कटी बस्‍ती इत्‍यादी आणि वसंत ऋतूमध्‍ये वमन ही पंचकर्मे सांगितली आहेत.

रोगी व्‍यक्‍तींसाठी बस्‍ती

पॅरेलिसिस, गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्‍याचे विकार, संधिवात, वातरक्‍त, आमवात, गुल्‍म, पोटफुगी, पडसे, शुक्र, वात आणि मल यांचा अवरोध, मलावष्‍टंभ, अश्‍मरी (stone), रजोनाश (स्‍त्रियांचा विटाळ बंद होणे), जुनाट वातरोग आदी रोगांमध्‍ये हृदय बस्‍ती, मन्‍या बस्‍ती, जानू बस्‍ती, कटी बस्‍ती अशा विविध बस्‍ती त्‍या त्‍या रोगांनुसार दिल्‍या जातात.

१. मन्‍या बस्‍ती (ग्रीवा बस्‍ती) : यामध्‍ये मानेच्‍या ठिकाणी पाळे तयार करून काही वेळ औषधी तेल पकडून ठेवले जाते.

उपयोग – स्‍पाँडिलायटीस, मान आखडणे, दोन्‍ही हातास मुंग्‍या येणे

२. जानू बस्‍ती : यामध्‍ये गुडघ्‍याभोवती जानू बस्‍ती यंत्र लावून त्‍यात औषधी तेल विशिष्‍ट काळ ठेवले जाते.

उपयोग – संधीवात, सांध्‍याची झीज होणे, गुडघेदुखी, कुर्चीका इजा इ.

३. कटी बस्‍ती : यामध्‍ये कमरेच्‍या ठिकाणी विशिष्‍ट पद्धतीने केलेल्‍या पाळ्‍यांमध्‍ये काही वेळ औषधी तेल पकडून ठेवले जाते. याशिवाय औषधी तेलांच्‍या धारा केल्‍या जातात.

उपयोग – स्‍पाँडिलायटीस, कटीस्‍तंभ, कंबरदुखी, स्‍लिपडिस्‍क, सायटिका, पायास मुंग्‍या येणे, पाय जड होणे इ.

पंचकर्म उपचार तज्ञ वैद्यांच्‍या मार्गदर्शनाखालीच घ्‍यावेत. त्‍याने दुष्‍परिणाम होत नाहीत. हे सर्व लाभ मिळवायचे असतील, तर पंचकर्मे उपचार वर्षातून किमान एकदा तरी करून घेतलेच पाहिजेत.

– वैद्य योगिता थिटे, सार्थ आयुर्वेद चिकित्‍सालय आणि पंचकर्म केंद्र, रहाटणी, पुणे