सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
वैशाख कृष्ण सप्तमीच्या शुभतिथीला फर्मागुडी, गोवा येथील मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव भावपूर्णरित्या साजरा झाला. या वेळी रथारूढ श्रीविष्णुरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांना दर्शन दिले. या वेळी रथाचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.
रथाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य सांगतांना ईश्वराने मला सांगितले, ‘सर्वसाधारणत: रथांमध्ये पुढे सारथी आणि मागे राजा किंवा योद्धा यांना बसण्याची व्यवस्था असते; याउलट या रथात तिन्ही गुरूंना बसण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे. यातून ‘हा रथ साधारण नाही’, हे लक्षात येते. या रथाचे सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य, म्हणजे या रथाच्या रचनेत भक्ती, कर्म, ध्यान, ज्ञान आणि गुरुकृपायोग या सर्व योगमार्गांचे तत्त्व सामावलेले आहे. पुढील विश्लेषणातून हे सूत्र अधिक स्पष्ट होईल.
१. रथाचा पुढील भाग भक्तीयोगाचे प्रतीक असणे
रथाच्या पुढील भागात गरुड असून त्याच्या माध्यमातून ‘दास्यत्व, भक्ती, सेवाभाव, गुरुकार्याची तळमळ, सर्वस्व समर्पण’, अशा भक्तामध्ये आवश्यक असलेल्या गुणांची शिकवण मिळते. ‘श्री गुरूंची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) महती पूर्ण समाजापर्यंत नेणे’, हे भक्तांचे कार्य आहे. रथाच्या समोरील भागात रथ ओढण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ‘संपूर्ण जोमाने (बलाने) श्री गुरूंचे कार्य समष्टीत नेणे’, ही सर्वोतम भक्ती आहे’, हा त्या मागील भावार्थ आहे. गीतेतही भगवान श्रीकृष्ण म्हणतो, ‘जो हे परम गुह्य ज्ञान (रहस्ययुक्त गीतोपदेश) माझ्या भक्तांना सांगेल, तो मला सर्वाधिक प्रिय होईल.’
(संदर्भ -अध्याय १८ मध्ये श्लोक ६८ आणि ६९)
२. रथाची चाके ही कर्मगतीचे प्रतीक असणे आणि रथावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान असल्यामुळे ‘कर्मगतीवर त्यांचे नियंत्रण आहे’, असे जाणवणे
रथाची चाके हे कर्मगतीचे, म्हणजे सृष्टीत अव्याहतपणे चालू असलेल्या कर्मशृंखलेचे प्रतीक आहे. रथातील वाम (डावे) चाक प्रारब्ध कर्माचे, तर दक्षिण (उजवे) चाक क्रियमाण कर्माचे प्रतीक आहे. या चारही चाकांवर श्री गुरु विराजमान आहेत, म्हणजेच चारही कर्मगतींवर श्री गुरूंचे नियंत्रण आहे. रथाची चारही चाके फिरल्यावरच रथ गतीमान होतो. यातून ३ सूत्रे शिकायला मिळतात.
२ अ. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे व्यष्टी साधना केल्यास प्रारब्धाची झळ न्यून होणे : साधकांना प्रारब्धभोग भोगणे अनिवार्य आहे. रोग किंवा आजारपण अशा कर्मगतीमुळे (प्रारब्धामुळे) साधना होत नसल्याची खंत वाटत असल्यास ‘काळाच्या चाकांचे नियंत्रण श्री गुरूंकडे आहे’, हे लक्षात ठेवून शक्य तेवढी साधना करावी. त्यामुळे प्रारब्धाची झळ न्यून होईल. यातून श्री गुरूंनी सांगितलेले क्रियमाण कर्म केल्यास, म्हणजे ‘साधना केल्यासच आध्यात्मिक प्रगती होणार’, अशी व्यष्टी साधनेची शिकवण मिळते.
२ आ. समष्टीकडून साधना करवून घेण्याचे क्रियमाण कर्म निष्काम भावाने करणे : दुसरी शिकवण निष्काम कर्माची मिळते. ‘समष्टी साधनेच्या अंतर्गत अध्यात्मप्रसार आणि धर्मजागृती करतांना पुष्कळ क्रियमाण कर्म करूनही फळ मिळत नसेल, तेव्हा खचून न जाता क्रियमाणाचे हे चाक दुसर्या चाकालाही ओढत आहे, म्हणजे समष्टी प्रारब्धाचे अडथळे दूर करत आहे’, हे लक्षात ठेवावे. त्यासाठी ‘समष्टी क्रियमाण कर्मात, समष्टीची सात्त्विकता, भाव आणि साधना यांत वाढ करणे आवश्यक असणेे’, ही समष्टी साधनेची शिकवणही यातून मिळते.
२ इ. श्री गुरु काळावर विराजमान असल्याने ते शिष्याच्या साधनेत कुठलेही अडथळे येऊ देत नसणे : शिष्याची वेळ आल्यावर त्याला गुरुप्राप्ती होते. शिष्याचे प्रारब्ध, म्हणजे काळ. काळाचे अडथळे आल्यावर त्याला गुरुकृपा मिळण्यात अडथळे येतात; पण ‘श्री गुरु काळावर विराजमान असल्याने शिष्य आणि गुरु यांच्या भेटीत काळ अडथळे निर्माण करू शकत नाही’, हीच शिकवण रथाच्या रचनेतून मिळते.
३. रथावरील विविध नक्षी ध्यानयोगाचे प्रतीक असणे
ध्यानयोग म्हणजे मनाची एकाग्रता. प्राथमिक टप्प्याला मन एकाग्र करण्यासाठी आलंबनाची आवश्यकता असते. असात्त्विक घटकांच्या तुलनेत सात्त्विक घटकांवर आलंबन केल्यास मन लवकर एकाग्र होण्यास साहाय्य होते. रथावरील विविध सात्त्विक नक्षी, उदा. शंख, चक्र, सूर्य, चंद्र आणि फुले यांच्याकडे बघितल्यावर मन एकाग्र होण्याची अनुभूती येते.
४. रथावरील उर्ध्वभाग ज्ञानयोगाचे प्रतीक असणे
रथाच्या उर्ध्वभागावर तीन घुमट आणि एक ध्वज लावण्यात आला आहे. ध्वजावर एका बाजूला ‘सूर्य’ अन् दुसर्या बाजूला ‘ॐ’ चिन्ह आहे. रथावरील ३ घुमटांपैकी मोठा घुमट ज्ञानशक्तीचे आणि दोन छोटे घुमट अनुक्रमे इच्छाशक्ती अन् क्रियाशक्ती यांचे प्रतीक आहे. ज्ञानशक्तीतून इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांची निर्मिती होते. ‘सूर्य’ अन् ‘ॐ’ ही चिन्हे असलेला ध्वज विश्वज्ञानाचे प्रतीक आहे; कारण ज्ञान हे सूर्यासारखे तेजोमय आणि अंधकाराचा नाश करणारे असते. तसेच ते ‘ॐ’ प्रमाणे निर्गुण, बीजस्वरूप आणि सृष्टीची निर्मिती करणारे असते. (विविध विचारधारा, म्हणजे ज्ञानाचे एक स्वरूप. विविध विचारधारांमुळे वस्तू, पंथ, संस्था आणि राष्ट्र यांची निर्मिती झाली आहे.) ज्ञानशक्ती हे निर्गुण आणि आकाशतत्त्वाशी निगडित असल्यामुळे रथाच्या उर्ध्वभागात कुठेही देवतेचे सगुण रूप नाही.’
५. रथामध्ये सनातनच्या ३ गुरूंना बसण्यासाठी केलेली स्थाने ही गुरुकृपायोगाचे प्रतीक असणे
रथात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या बसण्याची व्यवस्था त्रिकोण स्वरूपात करण्यात आली होती. यात मध्यावर आणि उंच भागी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तर त्रिकोणाच्या अन्य दोन टोकांवर समान उंचीवर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ बसल्या होत्या. या संदर्भात ईश्वराने मला सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.
५ अ. रथावरील त्रिकोणी रचना शिष्यांनी गुरुतत्त्वाशी एकरूप होऊन मोक्ष प्राप्त करण्याचे प्रतीक असणे : ‘रथावरील त्रिकोणी रचना गुरुकृपायोगाशी निगडित आहे. शैव पंथीय शिवाशी, वैष्णव पंथीय विष्णूशी एकरूप होतात. त्याचप्रमाणे गुरुकृपायोगानुसार साधना करणारे गुरुतत्त्वाशी (श्री गुरूंच्या निर्गुण रूपाशी) एकरूप होतात. तिन्ही मोक्षगुरूंची बसण्याची त्रिकोणी रचना याचेच प्रतीक आहे.
५ आ. गुरुकृपायोगातील सर्वोच्च स्थिती म्हणजे अवतारत्व ! : अन्य योगमार्गांमध्ये समष्टी साधना शिकवली जात नाही. याउलट गुरुकृपायोगात समष्टी साधना शिकवली जात असल्याने ईश्वराच्या तारक आणि मारक अशा दोन्ही रूपांशी एकरूपता येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून अवतारांसारखे कार्य होत असून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा त्याच दिशेने प्रवास होत असल्याचे हे प्रतीक आहे. थोडक्यात रथावरील तिन्ही समष्टी गुरूंची बसण्याची रचना, म्हणजे संत, सद़्गुरु, समष्टी संत या टप्प्यांतून अवतारत्वाकडे होणार्या वाटचालीचे ते प्रतीक आहे.
५ इ. गुरुकृपायोग, म्हणजे सतत शिष्यभावात रहाण्याचे प्रतीक : गुरुकृपायोगानुसार साधना करणारा जीव कधीही उपदेशक नसतो. तो सतत शिष्यत्वाच्या स्तरावर असतो. हीच गोष्ट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी रथातील उच्चस्थान, तर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासाठी समान आसनाच्या माध्यमातून मध्यस्थान या रूपात दाखवण्यात आली आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ समष्टी गुरु असूनही त्यांनी ब्रह्मोत्सवात शिष्यभावाने श्री गुरूंची पूजा केली. यातून ‘गुरुकृपायोगात उपदेशक नाही, तर शिष्यत्व निर्माण होते’, याचे हे प्रतीक आहेे.’
६. साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी बनवलेला रथ ‘सनातन रथ’ असणे
ज्यांनी नेहमी सनातन धर्माची (अध्यात्माची) शिकवण दिली, ज्यांचे सूक्ष्म रूप सनातन धर्माशी एकरूप झाले आहे, ज्यांनी सनातनकडे (ईश्वराकडे) जाण्याच्या सर्व प्रमुख योगमार्गांचे गुरुकृपायोगात एकत्रिकरण केले आहे, जे सनातन धर्मराज्याचा (ईश्वरी राज्याचा), म्हणजेच हिंदु राष्ट्राचा उद़्घोष करत आहेत आणि ज्यांचे अस्तित्वच सनातनमय आहे, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ज्या रथावर बसणार, तो रथ सनातन होणार नाही का ? साधकांनी बनवलेला आणि ज्ञान, भक्ती, कर्म, ध्यान अन् गुरुकृपायोग या मार्गांनी नटलेला हा रथ ‘सनातन रथ’ आहे.
७. प्रार्थना
एका हिंदी भजनात श्री गुरूंचे वर्णन करतांना प.पू. भक्तराज महाराज म्हणतात, ‘ऐसा प्रभु मेरा दशरथी राम ।’ याचा अर्थ आहे, ‘दशरथी’, म्हणजे दहा इंद्रियांनी बनलेला रथ आणि त्यावर स्वतः श्री गुरु, म्हणजे श्रीराम विराजित झाले आहेत.’ असाच भावार्थ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त बनवलेल्या रथाचाही आहे. देवाने आपल्याला साधनेसाठी शरीर, मन, बुद्धी असे अनेक रथ दिले आहेत. या रथांना गुरुसेवा, भाव, भक्ती, तळमळ अशा गुणांनी सजवले, तर त्यातही दिव्यत्व निर्माण होऊन त्यात श्री गुरु येऊन बसतील. ‘या ध्येयाच्या प्राप्तीसाठी श्री गुरूंनी आम्हा साधकांना शक्ती, भक्ती आणि ज्ञान द्यावे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१४.५.२०२३, दुपारी १२ ते ३.१५ आणि १५.५.२०२३, सकाळी ८.४५ ते ११ )
|