प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला ३०० रुपयांचा एक गणवेश शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी देणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्‍यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्‍यांना समग्र शिक्षा अंतर्गत विनामूल्‍य गणवेश देण्‍याविषयी नुकताच आदेश प्रसिद्ध करण्‍यात आला आहे. त्‍यानुसार प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला ३०० रुपये किमतीचा एक गणवेश शाळा व्‍यवस्‍थापन समितीच्‍या माध्‍यमातून शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी उपलब्‍ध करून देण्‍याचे सूचित करण्‍यात आले आहे. या आदेशात ‘गणवेशाच्‍या रंगाविषयी शाळा व्‍यवस्‍थापन समितीने निर्णय घ्‍यावा’, असे नमूद केले आहे.

‘समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रक २०२३-२४ भारत सरकार यांच्‍या प्रकल्‍प मान्‍यता मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्‍यात समग्र शिक्षा अंतर्गत विनामूल्‍य गणवेश योजना अंदाजपत्रकात एकूण ३७ लाख ३८ सहस्र १३१ लाभार्थी विद्यार्थ्‍यांसाठी २२४ कोटी २८ लाख ६९ सहस्र एवढ्या निधीस केंद्र शासनाकडून संमती देण्‍यात आली.

शाळा व्‍यवस्‍थापन समितीने विद्यार्थ्‍यांच्‍या आकाराप्रमाणे गणवेश खरेदी करावेत, गणवेशाची शिलाई पक्‍क्‍या धाग्‍याची असावी, शिलाई निघाल्‍यास किंवा गणवेशाचे कापड फाटल्‍यास अथवा गणवेशाविषयी कोणतीही तक्रार उपस्‍थित झाल्‍यास त्‍याचे दायित्‍व शाळा व्‍यवस्‍थापन समितीचे राहील, असेही या परिपत्रकात नमूद करण्‍यात आले आहे.