सांगली, २९ मे (वार्ता.) – येथील वानलेसवाडी, विजयनगर परिसरात गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संत बाळूमामा मंदिराच्या माध्यमातून नि:शुल्क अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू आहे. येथे प्रत्येक रविवारी सामूहिक नामजप, भजन, कीर्तन यांसह अन्य नैमित्तिक उपक्रम होतात. त्यातीलच एक भाग म्हणून एक मासापासून प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ७ या वेळेत ५ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बालसंस्कारवर्ग चालवण्यात येत आहे.
बालसंस्कारवर्गात विद्यार्थ्यांना स्तोत्रे, श्लोकपठण, एकाग्रता वाढण्यासाठी काय प्रयत्न करावेत ?, श्रीराम-श्रीकृष्ण यांच्या गोष्टी, टीव्ही, भ्रमणभाषचे दुष्परिणाम यांसह माहिती देण्यात येते. तरी या बालसंस्कारवर्गाचा मुलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.