पुणे महापालिकेतील ३ अभियंत्यांनी बनावट कागदपत्रे देऊन मिळवली नोकरी !

पुणे – महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये अनुभवाचे बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याने ३ कनिष्ठ अभियंत्यांवर ठपका ठेवला आहे. मागील वर्षी १३५ जागांसाठी १२ सहस्रांहून अधिक अर्ज आले होते. उमेदवारांनी अनुभवाचा पुरावा म्हणून ‘फॉर्म १६’, बँकेचे स्टेटमेंट, पगारपावती, अनुभव प्रमाणपत्र, पीएफ क्रमांक यांसह अकरा प्रकारची कागदपत्रे जोडणे आवश्यक होते; मात्र काही जणांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र आणि पगार पावती जोडली, तसेच डिप्लोमाच्या आधारावर नोकरी मिळवतांना अभियांत्रिकीची पदवी लपवली. एका शहरात अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण घेत असतांना दुसर्‍या शहरात पूर्णवेळ नोकरी केल्याचा अनुभवाचा दाखला जोडला. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी तीन अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमून त्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या अहवालाअन्वये उमेदवारांनी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे स्पष्ट झाले आहे. या उमेदवारांना नोकरीवरून काढून टाकण्यापूर्वी नोटीस दिली जाणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

सरकारी नोकरी म्हणजे खाबुगिरीला वाव अशी मानसिकता झाल्याने या घटना घडतात. पारदर्शक व्यवहार असल्यास अशा गोष्टींना आळा बसेल !