भारताला विश्व गुरु बनवण्यासाठी अध्यात्माद्वारे मने प्रज्वलित करणे आवश्यक ! – गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री, गोवा

गोव्यात पार पडली ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२०’ परिषद !

गोव्यातील पहिली #C20 आंतरराष्ट्रीय परिषद प्रचंड यशस्वी करणाऱ्या सर्व वक्ते आणि स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार !

दाबोळी, २७ मे (वार्ता.) – प्रत्येकाचे मन प्रज्वलित करण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. हे सामूहिक सहभागातून झाल्यास भारताला विश्वगुरु बनवता येईल. हा संदेश तळागाळापर्यंत प्रत्येकापर्यंत पोचवला पाहिजे, असे आवाहन गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांनी केले. गोवा शासन, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आणि ‘भारतीय विद्या भवन, नवी देहली’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एक दिवसाच्या ‘सी-२०’ परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. गोविंद गावडे यांनी हे विधान केले.

दाबोळी, वास्को येथील ‘राजहंस नौदल सभागृहा’त २७ मे या दिवशी ‘जी-२०’ च्या अंतर्गत ‘सी-२०’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’च्या अध्यक्षा प्रा. डॉ. शशी बाला, ‘सिंगापूर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या मंडळाचे सदस्य श्री. मनीष त्रिपाठी, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री पूजा बेदी, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन समन्वयक सौ. श्वेता क्लार्क या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कु. ज्योत्स्ना गांधी यांनी केले. उद्घाटन समारंभानंतर विविध विषयांवरील चर्चासत्रांमध्ये उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विषयांचे सादरीकरण केले.

परिषदेचा प्रारंभ मंत्री श्री. गोविंद गावडे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करून झाला. यानंतर मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’च्या अध्यक्षा प्रा. डॉ. शशी बाला यांनी ‘सी-२०’चा ध्वज ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या संकेतस्थळाचे संपादक श्री. शॉन क्लार्क आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’च्या समन्वयक सौ. श्वेता क्लार्क यांना सुपुर्द केला. या वेळी ‘सी-२०’ परिषदेला अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला संदेश व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. मंत्री श्री. गोविंद गावडे यांच्या हस्ते ‘सी-२०’ परिषदेच्या संबंधी ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे) या वैशिष्ट्यपूर्ण चलचित्राचे अनावरण करण्यात आले.

मंत्री गोविंद गावडे पुढे म्हणाले की,

१. गोव्याची ओळख सध्या ‘सन, सँड अँड सी’ (सूर्य, वाळू आणि समुद्रकिनारे) अशी झाली आहे; मात्र गोव्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्याने वसाहतवादाच्या विरोधात लढा दिला आहे.

२. भारताने विश्वाला योग, आयुर्वेद आदी देणगी दिली आहे. भारतात जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे. ‘जी-२०’चे यजमानपद भारताला लाभणे, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. विश्वगुरु बनण्याचे ध्येय भारताने ठेवलेले आहे. भारताला नृत्य, साहित्य, चित्रकला, शिल्प आदींचा मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याची कोणतीही अपेक्षा न बाळगता सर्वांसमवेत देवाणघेवाण होणे आवश्यक आहे.

३. भारत हा केवळ विकसनशील देश नसून तो विकासित आणि महासत्ता म्हणून उदयास येत आहे. नवीन भारत निर्माण करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची आणि त्यांचा मौल्यवान वेळ देण्याची आवश्यकता आहे.

‘सी-२०’ने जगाला ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या ध्येयापर्यंत न्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात ‘सी-२0’ परिषदेचे आयोजन होत आहे, ही पुष्कळ आनंदाची गोष्ट आहे.  ‘सी-२०’ हा ‘जी-२०’ गटाचा एकमेव नागरी गट आहे. भारत देश ‘जी-२०’ परिषदेचा यजमान आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या ‘जी-२0’च्या बैठका भारतभर होत आहेत आणि गोव्यातही आरोग्य, विकास, पर्यटन, ‘ऊर्जा’ आदी विषयांवर  बैठका होत आहेत. जागतिक शांतता आणि जागतिक विकास या दृष्टीने गोव्यात होणार्‍या बैठका या गोमंतकियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारत ही जगाची आध्यात्मिक राजधानी आहे आणि म्हणूनच भारत ‘जी-२०’ देशांना एकसंघता, प्रगती आणि सर्वसमावेशकता साधण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगाचे नेतृत्व करू लागला आहे. ‘सी-२०’ परिषद ही ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजे ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे ध्येय समोर ठेवून ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर होत आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. ‘सी-२०’ने आवाज बनून जगाला ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या ध्येयापर्यंत न्यावे.

सी-२० परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केलेले उद्बोधक विचार !

अध्यात्मात जगातील सर्व समस्यांवर उपाय काढण्याची क्षमता ! – प्रा. डॉ. शशी बाला, अध्यक्षा, इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्

आज जगामध्ये आतंकवाद फोफावला असून सर्वत्र संघर्ष आणि गोंधळाचे वातावरण आहे. मनुष्य हा निसर्गाचा मालक बनला आहे. साम्यवाद, भांडवलवाद आणि व्यापारीवाद यांमुळे जगभरात अनादर, तसेच एखाद्या वर्गाला बहिष्कृत करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. जगात वाढलेला हा संघर्ष त्याग, तप, करुणा आणि प्रेम यांद्वारे नष्ट होऊ शकतो.

भारतीय ऋषि-मुनींनी दिलेल्या शिकवणीमुळे भारतच या दृष्टीकोनातून जगाला दिशादर्शन करू शकतो. त्यांच्या या शिकवणीमुळेच भारतीय नागरिक समावेशकता आणि परस्पर आदर यांवर विश्वास ठेवून भेदभाव करत नाहीत. विचारांतील पवित्रता, मनातील सुस्पष्टता आणि सूक्ष्मत्वाकडे मार्गक्रमण करणे, हे अध्यात्मामुळे शक्य आहे. जगातील सर्व समस्यांवर उपाय काढण्याची क्षमता अध्यात्मामध्ये आहे. आपण श्रद्ध (बिलिव्हर्स) आणि अश्रद्ध (नॉन-बिलिव्हर्स) यांच्यामध्ये जगाचे विभाजन करता कामा नये, असे प्रतिपादन ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्’च्या अध्यक्षा प्रा. डॉ. शशी बाला यांनी केले.

गोव्यात आध्यात्मिक पर्यटनास आरंभ करणार ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री, गोवा

गोवा शासनाच्या अंतर्गत आम्ही आध्यात्मिक पर्यटनास शुभारंभ करत आहोत. आमचे हे अभियान ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या तत्त्वाला अनुसरून आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने जी-२० च्या अंतर्गत असलेल्या सी-२० या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी विश्वविद्यालयाचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.

समाजातील प्रत्येकाला महत्त्व दिल्यास समाज प्रगतीशील होण्यास साहाय्य  ! – मनीष त्रिपाठी, सदस्य, सिंगापूर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

‘निष्पक्षता, परस्पर आदर आणि शिष्टाचार हे मानवी संबंध सुदृढ करून ते निभावणे आवश्यक आहे. दुर्दैवाने गेल्या ७५ वर्षांत आपण आपल्या पाठ्यपुस्तकांतून याविषयीचे शिक्षण दिले नाही. ज्या लोकांनी आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचीच ‘महानता’ शिकवण्यात आली.

जेव्हा भारत ‘विश्वगुरु’ बनण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जाते, तेव्हा आपल्याला लाज का वाटते ? वर्ष १९९१ मध्ये जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर विमान पोचले असता विमानाच्या आतच आमची तपासणी झाली होती. आजचे चित्र वेगळे आहे. समाजातील प्रत्येकाला महत्त्व दिल्यास परस्पर आदर निर्माण होऊन समाज प्रगतीशील होईल, हे आपण लक्षात घ्यायला हवे. सिंगापूरमध्ये विविध धर्मांचे लोक रहातात; मात्र त्यांच्यात एकोपा पहायला मिळतो, हे तेथील समाजाचे वैशिष्ट्य आहे.

विविध छटांच्या माध्यमातून ‘सी-२०’च्या उद्देशाची पूर्तता !

‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ ही महत्त्वपूर्ण मूल्ये कशा प्रकारे अंगीकारली पाहिजेत ?, याच्या विविध छटा वक्त्यांनी उपस्थितांसमोर सुरेखपणे विषय मांडून उलगडल्या. ‘भारतीय अध्यात्म’ आणि ‘सत्त्व, रज आणि तम’ ही संकल्पना समजल्यावर त्याचा समाजातील सर्व स्तरांच्या लोकांना कशा प्रकारे लाभ होऊ शकतो ?, याविषयी डावोस, स्वित्झर्लंड येथील व्यावसायिक श्री. हान्स मार्टिन यांनी मत मांडले.

‘दिव्यांग मुलांना कशा प्रकारे स्वीकारणे आवश्यक आहे ?’ याविषयी लंडन येथील डॉ. निशी भट्ट, भारतीय वैद्यकीय पद्धतींचा जागतिक स्तरावर सर्वांना लाभ करून देण्याविषयी अभिनेत्री पूजा बेदी, तसेच ‘हॉटेल्सच्या माध्यमातून मन:पूर्वक आतिथ्य करून विविधतेला स्वीकारण्याचा संदेश कसा देऊ शकतो ?, याविषयी ‘पार्क हॉटेल्स’चे व्यवस्थापक सौरभ खन्ना यांनी उद्बोधक विचार मांडल्याने सी-२० परिषदेला विविधांगी प्रायोगिक स्वरूप लाभले.