‘सावरकर विचार जागरण सप्ताह’
|
रत्नागिरी, २७ मे (वार्ता.) – गेले आठवडाभर येथे सावरकर विचार जागरण सप्ताह चालू आहे. याची सांगता २८ मे या दिवशी शोभायात्रा आणि सहभोजनाने होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमासाठी ऐतिहासिक पतित पावन मंदिराची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच पालकमंत्री उदय सामंत उपस्थित रहाणार आहेत.
वीर सावरकरांची १४० वी जयंती २८ मे या दिवशी आहे. त्या निमित्ताने सकाळी ८ वाजता कारागृह येथील स्वा. सावरकर स्मारक येथून शोभायात्रा निघणार असून जयस्तंभ, एस्.टी. स्टँड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ या मार्गे पतित पावन मंदिर येथे शोभायात्रेची सांगता होईल. यामध्ये विविध संस्थांचे चित्ररथ सहभागी होतील.
शोभायात्रा पतित पावन मंदिरात पोचल्यानंतर विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान मंत्री मंगलप्रभात लोढा आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना सावरकरप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटनांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक रवींद्र भोवड, पतित पावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, माजी अध्यक्ष अधिवक्ता बाबासाहेब परुळेकर, भागोजीशेठ कीर ट्रस्टचे विश्वस्त अधिवक्ता विनय आंबुलकर यांनी केले आहे.