गोवा : सांकवाळ येथे सापडलेल्या देवीच्या मूर्तीची तेथेच प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात हिंदूंकडून विचारविनिमय

भारत माता की जय आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या स्थानिक नेत्यांकडून शंखावली येथील परिस्थितीचा आढावा

खाडीतील पाण्यामध्ये खडकाळ जागेत सापडलेली देवीची मूर्ती
(चित्र सौजन्य : गोवन वार्ता लाईव्ह)

पणजी (पत्रक) – श्री क्षेत्र शंखावली प्राकारातील पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या प्राचीन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या परिसरात नदीच्या पात्रात प्रकटलेल्या देवीच्या प्राचीन मूर्तीच्या दर्शनासाठी २५ मे या दिवशी हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि श्री विजयादुर्गा मंदिराच्या पुनर्निर्माण चळवळीचे अध्वर्यू डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय बजरंग दलाचे राज्य अध्यक्ष नितीन फळदेसाई, भारतमाता की जय संघाच्या धर्मजागरण प्रकोष्टाचे प्रतिनिधी राजेंद्र वेलिंगकर आणि करणी सेनेचे गोवा प्रमुख संतोषसिंह राजपूत उपस्थित होते. या वेळी एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात येऊन खाडीत सापडलेल्या श्री देवीच्या मूर्तीची श्रीक्षेत्र शंखावलीत रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. आतापर्यंत संपूर्ण गोव्यातून सुमारे २ सहस्र भाविकांनी या देवीचे दर्शन घेतले असून ३१ विविध हिंदु संघटनांनी देवीची श्रीक्षेत्र शंखावलीतच पुनर्प्रतिष्ठापना व्हावी, यासाठीच्या कार्यास पाठिंबा दिला. या वेळी डॉ. कालिदास वायंगणकर आणि प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांची पत्रकारांनी मुलाखत घेतली.

उपजिल्हाधिकार्‍यांनी मूर्ती २४ घंट्यांच्या आत त्वरित सरकारच्या कह्यात द्यावी, अशा आशयाची बजावलेली नोटीस हा हिंदु धर्मभावना आणि हिंदु श्रद्धा यांत केला गेलेला हस्तक्षेप आहे. ही नोटीस त्वरित मागे घेतली जावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

गेली १० वर्षे सरकारच्या पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिराच्या संरक्षित वारसास्थळ जागेत बाह्यशक्तींना हस्तक्षेप कसा करू दिला ? वारसा अवशेष, मंदिराची प्राचीन तळी आणि विशाल वटवृक्ष कसे नष्ट करू दिले ? याचे पुरावे उपलब्ध आहेत. आता साक्षात देवीच प्रकटली आहे, असा हिंदूंचा विश्‍वास आहे. सरकारने हिंदु धर्मभावनेत हस्तक्षेप करू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली.