छत्रपती संभाजीनगर येथे बढती मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसाने घेतली लाच !

भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – सातारा पोलीस ठाण्यातील पोलीस फौजदार मच्छिंद्र ससाणे हे एका कौटुंबिक वादातून प्रविष्ट ४९८ च्या गुन्ह्याचे अन्वेषण करत होते. या गुन्ह्यात आरोपींना साहाय्य करण्यासाठी ससाणे यांनी तक्रारदाराकडून २५ सहस्र रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २४ सहस्र रुपये द्यायचे ठरले. त्यानंतर २५ मे या दिवशी ससाणे यांना २४ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे २४ मे या दिवशी ससाणे यांना पोलीस फौजदारपदी बढती मिळाली म्हणून दिवसभर त्यांनी लोकांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले होते आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांना लाच घेतांना अटक करण्यात आली.

अर्ज निकाली काढण्यासाठी २० सहस्रांची लाच घेतांना पोलीस फौजदारास अटक !

सिडको पोलीस ठाण्यातील पोलीस फौजदार नितीन मोरे यांनी पोलीस ठाण्यात संपत्तीविषयी प्रविष्ट तक्रार अर्जात गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि गुन्हा नोंद केल्यास आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे २० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत १२ सहस्र रुपये द्यायचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाच्या पथकाने १२ सहस्र रुपयांची लाच घेतांना नितीन मोरे यांना अटक केली. मोरे हे ४ मासांपूर्वीच फौजदार झाले होते.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांना बढती मिळतेच कशी ? वरिष्ठ पोलीस अधिकारी या कर्मचार्‍यांच्या कामांचा आढावा घेत नाहीत का ? अटक केलेल्या दोन्ही भ्रष्ट फौजदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !