भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय १९ मे २०२३ या दिवशी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केला. त्याची कार्यवाही कशी होईल ? आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ?, याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
१. स्वतःकडे असलेल्या २ सहस्र रुपयांच्या नोटेचे काय करायचे ?
ज्या नागरिकांकडे २ सहस्र रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करून त्या बदल्यात अन्य नोटा मिळवता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने त्यासंबंधी पत्रकाच्या माध्यमातून बँकांना सूचना दिली आहे. नोटा पालटण्याची प्रक्रिया २३ मे २०२३ पासून चालू झाली आहे.
२. रिझर्व्ह बँकेचे ‘स्वच्छ नोट धोरण’
रिझर्व्ह बँकेच्या ‘स्वच्छ नोट धोरणा’च्या अनुषंगाने २ सहस्र रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र ‘त्या नोटेला कायदेशीर मान्यता कायम असेल’, असेही पत्रकात म्हटले आहे. तथापि या नोटा चलनातून काढून घेण्याच्या निर्णयामुळे सर्व बँकांना येत्या ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांकडून २ सहस्र रुपये मूल्याच्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांना या नोटा बँकेत जमा करून इतर मूल्याच्या नोटा मिळवता येतील. याखेरीज रिझर्व्ह बँकेच्या १९ प्रादेशिक शाखांमध्येही नोटा पालटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
३. नोटा पालटण्याची मर्यादा किती ?
२३ मेपासून नागरिकांना कोणत्याही बँक शाखेतून एकाच वेळी केवळ २० सहस्र रुपयांच्या मर्यादेपर्यंत २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटता येणार आहेत. ‘के.वाय्.सी.’ (आधारकार्ड, पॅनकार्ड आणि तत्सम कागदपत्रांची) पूर्तता असणारे बँक खातेधारक कितीही रकमेपर्यंत नोटा पालटून घेऊ शकतील. बँकांकडून ग्रामीण आणि दुर्गम भागांत नियुक्त व्यापार प्रतिनिधींकडून नोटा पालटणे शक्य असून ते दिवसाला प्रत्येक खातेदाराला कमाल ४ सहस्र रुपये मूल्याच्या (२ सहस्र रुपयांच्या २ नोटा) पालटून देऊ शकतील.
४. नोटा पालटण्यासाठी बँकेत खाते आवश्यक आहे का ?
कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन २ सहस्र रुपयांची नोट पालटून त्याबदल्यात त्या मूल्याच्या नोटा मिळवता येतील.