नवी मुंबई, २२ मे (वार्ता.) – ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी दीपा चौहान या महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या आरोपातून गणेश नाईक यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे; पण नुकतेच दीपा चौहान यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या सांगण्यावरून गणेश नाईक यांच्या विरुद्ध तक्रार केली असल्याचे निवेदन नेरूळ पोलीस ठाण्यात दिले आहे. प्रत्यक्षात चौगुले यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडण केले आहे. ‘चौहान यांच्या मागे बोलवता धनी वेगळा आहे, तो पोलिसांनी शोधावा’, अशी मागणी चौगुले यांनी केली आहे.
या गुन्ह्यामध्ये आम्हाला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, तसेच या महिलेने केलेल्या आरोपाच्या विरोधात न्यायालयात दावा प्रविष्ट करणार आहे. ‘या पत्राविषयी पोलिसांनी चौहान यांची नार्काे टेस्ट करावी’, अशी मागणी केली आहे.