देशातील ९५ सहस्र ९२९ घोटाळ्‍यांत ३२ सहस्र ९१ कोटींचा अपहार !

रिझर्व्‍ह बँकेत ‘सायबर क्राईम’ वर्गीकरणच नाही !

सायबर क्राईम

नागपूर – ‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी पोलिसांत ‘सायबर क्राईम’ असा स्‍वतंत्र विभाग आहे; मात्र रिझर्व्‍ह बँकेत ‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी ‘सायबर क्राईम’ असे वर्गीकरणच नाही. वर्ष २०२२-२३ मध्‍ये आर्.बी.आय.अंतर्गत येत असलेल्‍या देशातील सर्व बँकांमध्‍ये एकूण ९५ सहस्र ९२९ घोटाळे झाले. या घोटाळ्‍यांत एकूण ३२ सहस्र ९१ कोटी रुपयांची रक्‍कम अडकली आहे, अशी माहिती बँकेने माहिती अधिकारात दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती.

रिझर्व्‍ह बँकेमध्‍ये ‘सायबर क्राईम’ असे स्‍वतंत्र वर्गीकरण नाही. ए.टी.एम्., क्रेडिट आणि डेबीट कार्ड, इंटरनेट बँकिंग अशा नावाखाली त्‍याची नोंद होते, असे कळवले आहे. यात देशातील बँक कर्मचार्‍यांनी ३ सहस्र ३१८ इतके घोटाळे केले असून त्‍यात ३ सहस्र ६४७.९२ कोटी रकमेचा अपहार झालेला आहे. सेंट्रल को-ऑप. बँक आणि राज्‍य सहकारी बँकेतील घोटाळे अशी नेमकी माहिती रिझर्व्‍ह बँकेकडे उपलब्‍ध नाही.

४८ सहस्र ४६१.४३ कोटी जनजागृतीवर व्‍यय !

विविध सहकारी बँकांत झालेल्‍या घोटाळ्‍यात एकूण १ सहस्र कोटींची रक्‍कम गुंतलेली आहे, अशी माहिती रिझर्व्‍ह बँकेने दिली आहे. वर्ष २०२२-२३ मध्‍ये देशातील अर्बन को-ऑप. बँकांमध्‍ये झालेल्‍या ७६४ घोटाळ्‍यांत ४१४.५४ कोटी रुपयांचा अपहार झाला आहे, तसेच मार्च २०२३ पर्यंत ४८,४६१.४३ कोटी लोकशिक्षण आणि जनजागृतीवर व्‍यय करण्‍यात आले आहेत.

९ सहकारी बँकांचे परवाने रहित !

रिझर्व्‍ह बँकेच्‍या अंतर्गत येणार्‍या देशातील सर्व बँकांमध्‍ये एकूण १४ लाख ५० सहस्र ४०५ कर्मचारी कार्यरत आहे, तर अर्बन को. ऑप. बँकेत १ लाख ८९४ कर्मचारी काम करत आहेत. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत एकूण ९ सहकारी बँकांचे परवाने रहित करण्‍यात आले आहेत. वर्ष २०२२-२३ मध्‍ये सर्वाधिक घोटाळे झालेल्‍या बँकांमध्‍ये आयडीबीआय, आयसीआयसीआय, महाराष्‍ट्र बँक, सेंट्रल बँक आदींचा समावेश आहे.

विविध बँकांत कोट्यवधी रुपयांचा अपहार !

आयडीबीआय बँकेच्‍या ५८५ घोटाळ्‍यांत ४ सहस्र ६२.६४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. आयसीआयसीआय बँकेत ६ सहस्र ७६९ घोटाळ्‍यांत १ सहस्र २०४.३३ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. बँक ऑफ बडोदात ७८४ घोटाळ्‍यांत १ सहस्र ७७९.९८ कोटी, कॅनरा बँकेत १५८ घोटाळ्‍यांत २ सहस्र ८६२.५२ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडियात ५३५ घोटाळ्‍यांत १ सहस्र १०८.८७ कोटी आणि पंजाब अ‍ॅण्‍ड सिंध बँकेत १३२ घोटाळ्‍यांत १ सहस्र ३६२.५७ कोटी रकमेचा अपहार झालेला आहे.