६९ अल्पवयीन मुसलमान मुले सापडल्याचे प्रकरण
कोल्हापूर – १७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ही मुले कोणत्याही कागदपत्रांविना बंगाल ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर कशी काय येऊ शकली ? इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना शयनयान तिकीट कसे काय मिळाले आणि या प्रवासात त्यांच्याकडे तिकीट तपासनिसाने कागदपत्रांची मागणी केली नाही का ? तरी हा सर्व प्रकार गंभीर असून धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली जिल्ह्यांतर्गत काय प्रकार घडत आहेत ? यासाठी ‘विशेष पथका’च्या माध्यमातून अन्वेषण करा, अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष श्री. कुंदन पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
१. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच गणवेशात मदरशात नेण्याचे कारण काय ?
२. अशा मुलांना यापूर्वी किती वेळा आणि कोणत्या मदरशांमध्ये आणले गेले आहे ? याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे.
३. उच्चस्तरीय विशेष पथकाच्या माध्यमातून अन्वेषण करावे.
पोलिसांनी कह्यात घेतलेल्या ६९ मुलांना कागल येथील ‘चाईल्ड वेल्फेअर समिती’च्या कह्यात देण्यात आले आहे. आजरा शहरात २ मदरसे असून येथे बिहारसमवेत अनेक शहरांतून धार्मिक शिक्षणासाठी मुले येतात. त्यामुळे पोलिसांनी आजरा येथील २ मौलवींना अधिक अन्वेषणासाठी बोलावले आहे. |